

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचारामुळे गर्भवती राहिलेल्या १२ वर्षीय मुलीचे लग्न तिच्या पालकांनी अत्याचार करणार्या नराधमासोबत लावल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिचे वय बारा वर्ष असल्याचे निष्पन्न झाले. मुलीवर अत्याचार करणार्या तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी २२ वर्षीय तरुणाने शेजारी राहणार्या १२ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यातून मुलगी गर्भवती राहिली. या प्रकराची माहिती पीडित मुलीच्या पालकांना समजली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याऐवजी मुलीपेक्षा १० वर्ष मोठ्या तरुणासाेबत तिचे लग्न लावून दिले. दोघांना संसार देखील थाटून दिला होता. या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यावर या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
पीडित मुलीला आई नाही, वडील तिचा सांभाळ करायचे. मात्र, कामानिमित्त ते दिवसभर घराबाहेर असत. मुलगी गर्भवती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. समाजात बदनामी होईल, या भीतीने त्यांनी मुलीचे लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिले. हे प्रकरण एका आशा वर्करच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना यासंदर्भात सूचना दिली. त्यामुळे या प्रकरणाचा खुलासा झाला.
हेही वाचलंत का ?