अमरावती, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गणरायाच्या विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा दोन वेगवेगळया घटनेत नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. परतवाडा तालुक्यातील ईसापूर आणि दर्यापूर येथील दारापूर गावातील या घटना आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृतकांमध्ये एकाच परिवारातील काका-पुतण्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. शोध आणि बचाव पथकाने तिघांचेही मृतदेह बुधवारी (दि.१८) नदीतून बाहेर काढले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अचलपूर तालुक्यातील ईसापुर येथील रहिवासी अमोल ईश्वरधर ठाकरे (वय ३९) आणि मयूर गजानन ठाकरे (वय २७) हे दोघेही काका-पुतणे मंगळवारी (दि.१७) गणपती विसर्जनासाठी आसेगाव येलकी पूर्णा परिसरात गेले होते. यावेळी पूर्णा नदीमध्ये विसर्जन करताना दोघेही बुडाले. गावातील दहा ते बारा नागरिक ट्रॅक्टरने पूर्णा नगर येथे गेले होते. तेव्हा विसर्जन करताना ही घटना घडली. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत शोध मोहिम राबविण्यात आली होती. मात्र त्यांचा मृतदेह मिळाला नव्हता. अखेर आज बुधवारी (दि.१८) सप्टेंबर रोजी शोध आणि बचाव पथकाने मयूर ठाकरेचा मृतदेह हिंमतपूर आणि अमोल ठाकरेचा मृतदेह येलकी जवळ शोधून काढला.
अमोल ठाकरे ग्रामपंचायत कर्मचारी होता, तर मयूर हा एका खाजगी बँकेमध्ये कार्यरत होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. यासह दुसर्या एका घटनेमध्ये खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या दारापूर येथे विसर्जनासाठी गेलेला युवक देखील पूर्णा नदीपात्रात वाहून गेला. राजेश संजय पवार (वय २३) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह रेस्क्यू पथकाने गोताखोरांच्या मदतीने शोधला.
दर्यापूर तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या टाकळी येथे दरवर्षी गणेश विसर्जन केले जाते. विविध भागातील मंडळांनी गणेश विसर्जनकरीता आपापल्या मंडळाच्या भव्य-दिव्य मुर्त्या टाकळी येथे आणले होत्या. टाकळी येथील गणेश विसर्जनादरम्यान दर्यापूर येथील अमित गजाननराव देवके हे सुद्धा तेथे उपस्थित होते. गणपती विसर्जनावेळी ते नदीच्या प्रवाहात वाहून जात होते. त्यांना जय बजरंग मंडळाच्या पदाधिका-यांनी वाचविले. यावेळी टाकळी सरपंच टाले, लाखपुरी येथील लक्षेश्वर संस्थानचे अध्यक्ष राजा दहापुते व इतर कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.