मालेगाव : महिन्याभरापुर्वीच पुणे येथील अन्सारी कुटुंबातील सदस्य लोण्यावळ्यातील भुसी डॅम परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाचजण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच गिरणा नदीत मासेमारी करण्यासाठी रविवारी (दि.४) १० ते १२ जण गेले होते. हे सर्वजण संवदगाव शिवारातील गिरणा नदी पात्रात अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
चणकापूर व पुनद धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून संततधार सुरू असल्याने या दोन्ही धरणातून १५ हजार पेक्षा अधिक क्युसेकने पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरू आहे. असे असतानाही धुळे व मालेगाव शहरातील १० ते १२ जण संवदगाव शिवारातील गिरणा नदी पात्रात रविवारी (दि.४) रोजी मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी नदीला पाणी कमी होते. परंतु अचानक पाणी वाढल्याने हे सर्वजण नदीपात्राच्या मध्यभागी अडकून पडले.
यासंदभातील माहिती मनपाच्या अग्निशमनदलाला मिळताच आग्निशमन अधिकारी डॉ. संजय पवार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन पथकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांना वाचवण्यात अडथळे येत असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली. यावेळी नाशिक व धुळे येथील एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. रात्री उशिरा धुळे येथील पथक पोहचले असल्याची माहिती मिळाली आहे.