

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका ३८ वर्षीय स्टाफ नर्सला गुंगीचे औषध देऊन तिचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून, सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडित महिलेच्या वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे विनंती केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय महिला ही जिल्हा सामान्य रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहेत. ६ मे २०२६ रोजी त्या रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत वार्ड क्रमांक ४ मध्ये नाईट ड्युटीवर होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत गौरव शिरसाट नावाचा वॉर्ड बॉय देखील कार्यरत होता. तक्रारीनुसार, रात्री साडेआठच्या सुमारास त्या नर्सची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांचा रक्तदाब कमी झाला. त्यामुळे त्या उपचारासाठी अपघात विभागात गेल्या. तेथील डॉक्टरांनी त्यांना सलाईन आणि इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. मात्र, ड्युटी सुरू असल्याने त्यांनी वार्डमध्येच उपचार घेण्याचे ठरवले.
यानंतर त्या पुन्हा वार्ड क्रमांक ४ मध्ये परतल्या. त्यावेळी वॉर्ड बॉय गौरव शिरसाट याच्याकडे त्यांची पाण्याची बाटली होती. त्यांनी त्या बाटलीतील पाणी प्यायले असता पाणी कडू लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या. प्रकृती अधिक बिघडल्याने त्या वार्ड क्रमांक ३ मधील विशाल शिर्गरवाडे यांना भेटल्या. विशाल शिर्गरवाडे यांनी त्यांना नव्याने सलाईन आणि इंजेक्शन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. रात्री सुमारे ११.१५ वाजताच्या दरम्यान त्यांना सलाईन लावण्यात आली. त्यानंतर आपल्याला काहीही आठवत नसून आपण झोपेत गेल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.
सकाळी साडेसातच्या सुमारास जाग आल्यानंतर त्यांना आपले अंर्तवस्त्र काढले असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपला विनयभंग झाल्याचा संशय व्यक्त करत पीडित महिलेने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला असून, पीडितेला गुंगी येईल असे काहीतरी सलाईन किंवा पाण्यातून देण्यात आले का, याचा तपास सुरू केला आहे. यासाठी पीडितेचा रक्तनमुना घेऊन तो न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. पोलिसांकडून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, ड्युटीवरील कर्मचार्यांची चौकशी आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.