

अमरावती: नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामगाव शेत शिवारात शुक्रवारी रात्री एका युवकाची चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली.शनिवारी (दि.१८) सकाळच्या सुमारास रहाटगाव–रामगाव मार्गाने जाणार्या काही प्रवाशांना रस्त्याच्या कडेला झुडपांत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ याची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना दिली. मृतकाची ओळख सै. शाहरुख उर्फ नजीम सै. फारूक (वय ३५, रा. अकबर नगर, लालखडी, अमरावती) अशी झाली आहे.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासात मृताच्या गळ्याजवळ धारदार चाकूने खोल वार केल्याचे स्पष्ट झाले असून, त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती मिळताच अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, डीसीसी गणेश शिंदे तसेच फ्रेजरपुरा विभागाचे एसीपी कैलाश पुंडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. प्राथमिक चौकशीत ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, घटनेमागे कोणते कारण आहे याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू केली असून, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.
दरम्यान, शहर गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जलद कारवाई करत एका संशयितास ताब्यात घेतले आहे. मोबाइल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आरोपीला लालखडी परिसरातून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चौकशीदरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.या खळबळजनक हत्येमुळे रामगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदगाव पेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.