छत्रपती संभाजीनगर : एसएफएस जवळील मैदानावर अंडा ऑम्लेटचा गाडा चालविणाऱ्या सुरेश भगवान उंबरकर याची मंगळवारी (दि.१४) गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणाचा गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांच्या आत उलगडा केला. सचिन ऊर्फ जंगली मच्छिद्र जाधव (२४, रा. जुना बायजीपुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. दरम्यान, दोघांमध्ये एका मैत्रिणीच्या कारणावरून वाद झाला. नशेत तर्रर्र असलेल्या सचिनने सुरेशचा चाकूने गळा चिरल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिक माहितीनुसार, आरोपी सचिन व मृत सुरेश हे दोघे एकाच गल्लीत राहत. जीवलग मित्र होते. सचिन नेहमी जवाहर कॉलनी रोडवरील सुरेशच्या अंडा ओम्लेट गाडीवर जायचा. अनेकवेळा दोघे दिवसभर सोबत फिरायचे. मंगळवारीही सुरेशने त्याची गाडी न लावता सचिन सोबतच स्वतःच्या दुचाकीने फिरला. रात्री दोघेही एसएफएस मैदानावर गेले होते. त्यावेळी त्यांच्यात एका मैत्रिणीवरून वाद उफाळून आला.
दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. गांजाच्या नशेत तर्रर्रर्र आरोपी सचिनने चाकू काढून थेट सुरेशचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात सुरेश कोसळला. आरोपी सचिनने मैदानातून धूम ठोकली. दरम्यान, मैदानावर एका बाजूला बसलेल्या काही तरुणांमधून एक जण लघुशंकेसाठी येताच त्याला सुरेशचा मृतदेह दिसला. त्याने तात्काळ डायल ११२ ला संपर्क केल्याने जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, सिटी चौक ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी व उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांनी पाहणी केली. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, डीसीपी रत्नाकर नवले यांच्या सूचनेनुसार विविध पथकांनी तपास सुरू केला.
आरोपी सचिनच्या अंगावर मारहाणीच्या जखमा
सुरेशची हत्या केल्यानंतर आरोपी सचिन कैलासनगर भागातच लपतछपत फिरत होता. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ, जमादार नवनाथ खांडेकर, संदीप तायडे, संजय गावंडे, सुनील जाधव, योगेश नवसारे, सोमकांत भालेराव, राजेश यमदळ यांच्या पथकाने पंटर कामाला लावून सचिनचा माग काढत त्याला बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास कैलासनगर भागातूनच बेड्या ठोकल्या. त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा, ओरखडे होते. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सचिन रेकॉडवरील आरोपी असून, त्याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्नाचा एक गुन्हा यापूर्वी नोंद आहे.