

Amravati Dharani two brothers attacked
अमरावती : जिल्ह्यातील धारणीत दाणा मार्केट परिसरात रविवारी (दि.५) रात्री घडलेल्या रक्तरंजित चाकू हल्ल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. सुमारे १० अज्ञात हल्लेखोरांनी पूर्ववैमनस्यातून बैल व्यापार करणार्या दोन भावांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अकोट तालुक्यातील रहिवासी फाजिल अकिल बेग (वय ४५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांचा भाऊ नाजिल अकिल बेग (वय ४०) गंभीर जखमी झाला आहे.
रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोघेही दाणा मार्केट परिसरात असताना, मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. काहींच्या हातात चाकू, तर काहींकडे फाईटर पंच असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. क्षणातच परिसरात आरडाओरड सुरू झाली. फाजिल यांच्यावर जबरदस्त हल्ला करण्यात आला, तर नाजिल गंभीररित्या जखमी झाला. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात फाजिलचा मृतदेह पडला होता.
या घटनेची माहिती मिळताच नागरिकांची मोठी गर्दी धारणी उपजिल्हा रुग्णालयात झाली होती. पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शहरात प्रथमच अशा प्रकारची गँगस्टर पद्धतीची चाकू हल्ल्याची घटना झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. या घटनेमागे जुने वैर की आर्थिक व्यवहाराचा वाद आहे का, याबाबत तपास सुरू आहे.