

अमरावती : मेळघाटातील राणीगाव घाटात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ६० ते ७० फूट खोल दरीत पिकअप कोसळल्याने ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ७ ते ८ जण गंभीर जखमी आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.२२) रात्रीच्या सुमारास धारणीपासून सुमारे ३५ कि.मी. अंतरावर शिवाझरी ते राणीगावदरम्यान घडली
मृतांमध्ये एक महिला व तीन पुरुषांचा समावेश असून हे चौघेजण कंजोली (ता. धारणी) येथील आहेत. जखमींना तातडीने धारणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंजोली व राणीगाव येथील १५ ते २० नागरिक मध्य प्रदेशातील देडतलई येथे आठवडी बाजारासाठी गेले होते. सायंकाळी परत येताना घोडादेव बाबा मंदिराजवळील धामणनाला परिसरात पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काहींच्या मते रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन रिव्हर्स होऊन थेट दरीत कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. दरम्यान, वाहनचालक अपघातानंतर फरार झाला असून धारणी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. घटनेमुळे घाट रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुढील तपास सुरू असून मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही.