

बुलढाणा : जळगाव जामोद ते संग्रामपूर मार्गावरील चांगेफळ परिसरात वनविभागाने दोन ठिकाणी धाडी टाकून मोठ्याप्रमाणात अवैध लाकूड साठा जप्त केला आहे. या कारवाईत विनापरवाना साठवून ठेवलेले तब्बल ३६८ नग कडूूलिंब प्रजातीचे लाकूड जप्त करण्यात आले त्याची किंमत ४ लाख ७९ हजार ५०० रुपये आहे. या प्रकरणी वनविभागाने वन गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, वनविभागाच्या पथकाने चांगेफळ येथील संशयास्पद ठिकाणांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान विनापरवाना आणि अवैध रीतीने साठवून ठेवलेला कडूलिंबाच्या लाकडांचा मोठा साठा आढळून आला. वनविभागाने तातडीने या जागेचा पंचनामा करून वन गुन्हा नोंदवला आहे. यासोबतच खाटूश्याम सॉ मिल, न्यू सातपुडा सॉ मिल आणि जामोद परिसर या ठिकाणांचीही कसून तपासणी करण्यात आली.
खाटूश्याम सॉ मिलच्या बाहेरील एका खाजगी जागेमध्ये अवैध लाकूड साठा लपवून ठेवल्याचे आढळून आले. या कारवाईत अंदाजे ५० घनमीटर (३६८ नग) अवैध लाकूड जप्त करण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोदचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे,वनपाल एस. एस. सावळे, मोबाईल स्क्वॉड खामगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश राऊत तसेच वनरक्षक जी. एस. साकळे, प्रणव हागुणे या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.
लाकडांच्या अवैध वाहतूक आणि साठवणुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी परिसरातील सर्व सॉ मिल्सची तपासणी करण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. शासन एकीकडे वृक्षलागवडीचे मोठे उद्दिष्ट देत असताना, दुसरीकडे होणारी अवैध वृक्षतोड आणि वाहतूक अजिबात सहन केली जाणार नाही. सध्याच्या वाढत्या तापमानात वृक्षांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोड आणि वाहतूक करणाऱ्यांवर वनविभाग अत्यंत कडक पावले उचलत आहे.