

Amravati Municipal Corporation Election
अमरावती : मी जे बोलतो ते करतोच आणि जे नाही बोलत ते देखील करतो. कमी बोलतो पण जास्त काम करतो. अमरावती महापालिकेत आतापर्यंत सर्वच पक्षांची सत्ता होती. आता मात्र शिवसेनेचा अनुभव घ्या. शिवसेनेचा केवळ एकच अजेंडा आहे आणि तो म्हणजे शहराचा विकास. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना संधी द्या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केले. ते अमरावती येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.७) आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होत असताना मी उठाव केला. म्हणूनच लोकांनी आपल्याला स्वीकारलं. लोकसभेत आपला स्ट्राईक रेट चांगला होता, विधानसभेत देखील चांगला होता. नगरपरिषदेत निवडणुकीत देखील आपले सत्तर नगराध्यक्ष निवडून आले. खुर्ची मिळविणे आपला अजेंडा नाही, तर लोकांच्या समस्या सोडविणे आणि लोकांचा विकास करणे हा आपला अजेंडा आहे.
मात्र, काही लोक स्वतःच अस्तित्व वाचविण्यासाठी आणि खुर्चीच्या मोहासाठी एकत्र आले आहेत. पण शिवसेनेचा जन्म खुर्ची आणि सत्तेसाठी झालेला नाही. तर सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी झालेला आहे. पद वर खाली होत असतात पण मला महाराष्ट्रातील करोडो माता-भगिनींचा भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत तुम्हाला परिवर्तन हवे असेल बदल हवा असेल तर शिवसेनेच्या धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही, असा दावाही त्यांनी केला.
अमरावती शहरात कचऱ्याची समस्या आहे. मात्र त्यातून मार्ग मी काढल्याशिवाय राहणार नाही. नगर विकास विभागाच्या माध्यमातून शहरातील सर्व मूलभूत समस्या निकाली काढला जाते. मी माझ्या आईची काटकसर पाहिली, माझ्या पत्नीची परिस्थिती पाहिली. मी गरिबीतून पुढे आलेलो आहे. त्यामुळे घर चालवताना महिलांना, आमच्या बहिणींना किती त्रास जाणवतो हे मला माहित आहे.
त्यामुळेच मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि ती योजना सुरू झाली. या योजनेत खोडा घालणाऱ्यांना जनतेने चांगला धडा शिकवला आणि निवडणुकीत घरी बसवलं. त्यामुळे आता कोणीही आलं तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असेही एकाच शिंदे यांनी सांगितले.