

NCP President Sunil Varhade join BJP
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील वर्हाडे यांनी आपल्या समर्थकांसह शुकवारी (दि.२) अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेश उपाध्यक्ष पदाचा गुरुवारी रात्री राजीनामा दिल्यानंतर, अमरावती शहरालगत एका सभागृहात सुनील वर्हाडे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला. यावेळी मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अमरावती महापालिका निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले माजी मंत्री संजय कुटे, जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा, भाजपचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र वानखडे, खासदार डॉ. अनिल बोंडे आदी उपस्थित होते.
महानगरपालिका निवडणुक पार पडल्यावर जिल्हा परिषद निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान अशात जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी सुनील वर्हाडे यांनी समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला अमरावतीत जोरदार धक्का बसला आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे भाजप मध्ये स्वागत केले.
सुनील वर्हाडे यांनी अमरावती जिल्हा परिषदमध्ये विविध पदांवर कार्य केले आहे. ते दिवंगत मंत्री अनिल वर्हाडे यांचे लहान भाऊ आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते ३ वेळा संचालक होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राकॉंला जबर धक्का बसला आहे. याचे पडसाद आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिसणार आहे.