

अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीचे चित्र गुरुवारी (दि. ४ जून) नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांनी निवडणुकीतून आपली माघार घेतली आहे.
दुसरीकडे, उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे दार ठोठावणाऱ्या विप्लव बाजोरिया यांना हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे प्रवीण पोटे पाटील, महाविकास आघाडीचे हर्षजित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे नीलेश विश्वकर्मा यांच्यातच थेट त्रिकोणी लढत रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे.
या निवडणुकीसाठी आगामी १८ जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीतून माघार घेणारे अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांनी आपण काँग्रेस पक्षाचे समर्पित कार्यकर्ते असल्याचे सांगत, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे विप्लव बाजोरिया यांचा नामांकन अर्ज प्रशासनाने छाननीदरम्यान बाद ठरवला होता. या निर्णयाविरोधात बाजोरिया यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून निवडणूक लढवण्याची परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत पुढील सुनावणी थेट दोन आठवड्यांनंतर ठेवली आहे. परिणामी, बाजोरिया या निवडणुकीच्या रिंगणातून पूर्णपणे बाद झाले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, बाजोरिया यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.प्रहार आणि एमआयएम किंगमेकरच्या भूमिकेत:या निवडणुकीतील संख्याबळाचा आणि आकड्यांचा विचार केला तर भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि युवा स्वाभिमान पक्ष मिळून महायुतीचे पारडे अत्यंत जड आणि स्पष्ट बहुमताचे दिसत आहे. मात्र, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची महाविकास आघाडी ही अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या २५ मतांवर डोळा ठेवून आहे.
या संपूर्ण लढतीत प्रहार जनशक्ती पक्षाचे २१ मतदार आणि एमआयएमचे १६ मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, यावर निवडणुकीचा अंतिम कौल अवलंबून असणार आहे. महाविकास आघाडीचे हर्षजित देशमुख हे महायुतीचे तगडे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांना कशी टक्कर देतात आणि स्थानिक पातळीवरील गणिते कशी फिरवतात, याकडे आता संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.