

जळगाव - जिल्ह्यात बहुप्रतीक्षित 'मिनी मंत्रालय' म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा अद्याप पत्ता नसतानाच, अचानक जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीने जळगावचे राजकीय तापमान थेट चाळीशीपार नेले आहे. आगामी १८ जून रोजी होणाऱ्या या मतदानापूर्वीच जिल्ह्याच्या राजकारणात 'दौंड थोपटण्या'चे आणि छुपे मनसुबे रचण्याचे राजकारण गतिमान झाले आहे. महायुतीमध्ये या जागेवरून 'शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप' असा अंतर्गत सामना रंगण्याची स्पष्ट चिन्हे असून, पडद्यामागे तिकीट कोणाला मिळणार आणि कोण कोणाचा गेम करणार, यावरून खलबते सुरू झाली आहेत.
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर झाले आहे. १८ जून रोजी मतदान विधान परिषदेसाठी होणार आहे. मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीपूर्वीच जळगाव जिल्ह्यात राजकारणात तापले आहे. या रिंगणात महायुतीकडून प्रताप पाटील (शिंदे गट), डॉ. केतकी पाटील, नंदू अडवाणी व नंदकिशोर महाजन (भाजप) आणि महाविकास आघाडीचे छुप्या भूमिकेतील शिलेदार आहे.
जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि 'पालकमंत्री विरुद्ध संकटमोचक' यांच्यातील अंतर्गत अस्तित्वाची लढाई म्हणून राहणार आहे की नाही ते पाहणे महत्वाचे आहे.
'पुत्रप्रेमा'साठी पालकमंत्र्यांचे 'प्रताप' की भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला?
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आजवरचा इतिहास पाहता भाजपचा नेहमीच 'बोलबाला' राहिला आहे. केवळ एकाच अपवादात्मक वेळी भाजपला या जागेवर पराभवाचा झटका सहन करावा लागला होता. मात्र, यंदाची समीकरणे बदलली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले सुपुत्र प्रताप पाटील यांच्यासाठी ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. शहरात लागलेल्या 'भावी आमदार' अशा प्रताप पाटलांच्या बॅनर्सनी भाजपच्या गोटात आधीच अस्वस्थता निर्माण केली आहे.
दुसरीकडे, भाजपकडून डॉ. केतकी पाटील, नंदू अडवाणी आणि नंदकिशोर महाजन यांनीही जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून, पक्षाने ही जागा आपल्याकडेच राखण्यासाठी हट्ट धरला आहे. त्यामुळे महायुतीत ही जागा नेमकी कुणाच्या वाट्याला जाते, यावर बरेच काही अवलंबून असेल.
संख्याबळाचे गणित: महायुतीचे पारडे जड, पण 'भंडारा' कुणाला मिळणार?
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरसेवकांचे संख्याबळ पाहिले तर महायुतीचे पारडे वरवर तरी जड दिसते.
भाजप: सर्वाधिक नगरसेवक (प्रथम क्रमांकावर)
शिवसेना (शिंदे गट): दुसऱ्या क्रमांकावर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): तिसऱ्या क्रमांकावर.
जर महायुतीने शिवसेनेच्या प्रताप पाटील यांना उमेदवारी दिली, तर त्यांचा मार्ग अत्यंत सुकर होईल. परंतु, भाजपने उमेदवारी नाकारल्यास आणि बंडखोरी झाल्यास प्रताप पाटील यांना 'महाविकास आघाडी'कडे छुप्या मदतीचा हात मागावा लागेल. विरोधी गोटात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे सर्वाधिक मते आहेत, त्याखालोखाल काँग्रेस आणि काही मोक्याचे अपक्ष व स्थानिक आघाड्यांचे मतदार आहेत. त्यामुळे महायुतीत बिघाडी झाली, तर छुप्या मतदानाची आणि फोडाफोडीची मोठी लागण जिल्ह्याला होऊ शकते.
गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या 'बंद दाराआडच्या' खलबतांवर मदार!
जळगावच्या राजकारणाचे दोन प्रमुख ध्रुव म्हणजेच भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि शिवसेनेचे तोफखाना गुलाबराव पाटील. या दोन्ही नेत्यांमध्ये या जागेवरून काय समझोता होतो किंवा कोणती राजकीय तडजोड यावरच निवडणुकीचे भवितव्य ठरेल.
दोन्ही नेत्यांनी समन्वयाची भूमिका घेतली तर निवडणूक 'बिनविरोध' होण्याचे मार्ग मोकळे होतील, अन्यथा महायुतीमधील छुपी फूट थेट मतपेटीतून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. १८ जूनच्या रणसंग्रामापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतच जळगावच्या या राजकीय नाटकाचा पूर्वार्ध स्पष्ट होईल, यात शंका नाही!