

Dharani Harisal Road Murder
अमरावती : धारणी ते हरीसाल मार्गावर उतावली शेतशिवारात बेपत्ता चिंटू उर्फ मो.जुबेर अब्दुल जहूर याचा दोन दिवसापूर्वी कुजलेला मृतदेह आढळला होता. अनैतिक संबंधातून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून आरोपी पती-पत्नीला ताब्यात घेतले आहे. त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. बुडा गंगाराम जांभेकर (वय ४९) व त्याची पत्नी ( दोन्ही रा. कुसुमकोट ह.मु राणीग्राम) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
माहितीनुसार २४ डिसेंबर रोजी उतावली येथे एका शेतातील विहिरीत भाजी विक्रेता चिंटू उर्फ मो.जुबेर अब्दुल जहूर (वय ३९) याचा कुजलेला मृतदेह आढळला होता. मृतदेहाची प्रथम दर्शनी पाहणी केले असता शरीरावर दगडी जात्याचे पाठ दोरीने बांधून विहिरीत टाकल्याचे दिसून आले. त्यावरून मृतकाचे भाऊ मो. रमीज मो जहूर यांनी धारणी पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या भावाची हत्या झाल्याची तक्रार दाखल केली.
या प्रकरणाची गंभीरता पाहून गुन्हे शाखेने तपास सुरू केला आणि घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. घटनेबाबत शेजार्यांना विचारपूस केली असता माहिती मिळाली की, १९ डिसेंबर रोजी रात्री मृतक चिंटू उर्फ मो.जहूर हा विकास पटेल यांच्या शेतात राहणार्या बुडा जांभेकर यांच्या झोपडीवर दिसून आला होता. यावरून पोलिसांनी आरोपी बुडा जांभेकर याला ताब्यात घेतले. प्रथम त्याने उडवा उडवीचे उत्तर दिले. मात्र, नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी त्याला आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय अधिकारी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, धारणीचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक निरीक्षक सचिन पवार, उपनिरीक्षक सचिन झाल्टे, गजेंद्र ठाकरे, युवराज मानमोठे, रवींद्र वर्हाडे, सागर नाठे, शांताराम सोनोणे, जगत तेलगोटे, शिवा शिरसाट, प्रशिक वानखडे यांनी केली.
माहितीनुसार आरोपी बुडा जांभेकर याच्या पत्नीशी मृतक चिंटू उर्फ मो.जुबेर याचे अनैतिक संबंध होते. याच कारणावरून १९ डिसेंबरच्या रात्री आरोपीने मो.जूबेर अ.जहूर याला फोन करून आपल्या झोपडीवर बोलावले. येथे आरोपीने त्याच्याशी वाद करून त्याचा गळा दोरीने आवळून खून केला व त्याचा मृतदेह सुभाष मनोहर यांच्या शेतातील विहिरीत पत्नीच्या मदतीने फेकून दिला. यावरून पोलिसांनी दोन्ही पती-पत्नींना ताब्यात घेतले आहे.