

अमरावती : मोटर सायकल स्वाराला भरधाव वेगाने जाणार्या अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर नातवाला मोर्शी उपजिल्हा रुग्णालय येथून गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. घटना आज दि.२३ डिसेंबर रोजी ३.३० वाजता मोर्शी ते आष्टी मार्गावरील सिंभोरा गावानजीक घडली. करीमशहा रहमानशहा (वय ५५) तसेच तमीजाबी रहमानशहा (वय ६८) दोघेही रा. आष्टी असे दोघे या अपघातात ठार झाले.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आष्टी येथील करीमशहा रहमानशहा, तमीजाबी रहमानशहा व फारुक शहा करीमशहा (वय २४) हे आपली मोटरसायकल क्रमांक एम एच ३१ आर ३३ १२ ने आष्टी येथून मोर्शीला काही कामानिमित्त येत होते.
दरम्यान सिंभोरा गावाजवळ विरुद्ध दिशेने येणार्या अज्ञात वाहनाने मोटर सायकल स्वाराला जबर धडक दिली. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन करीम शहा रहमानशहा व तमीजावी रहमानशहा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तिघांनाही अॅम्बुलन्स मध्ये टाकून उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे रवाना केले.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी करीमशहा व तमीजाबी यांना मृत घोषित केले तर फारुख शहा करीम शहा यांना गंभीर अवस्थेत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्कॉड विभागाचे पोलीस उपनिरीक्षक आकाश शिवणकर,पीएसआय राजू धुर्वे,छत्रपती करपते,स्वप्निल बायस्कर,अथर्व कोहळे हे अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास आरंभीला आहे.