

अमरावती : ट्रकचा टायर पंक्चर झाल्याने तो खाली उतरून तपासणी करत असताना पाठिमागून आलेल्या भरधाव १२ चाकी ट्रकने चिरडल्याने क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.८) पहाटे आमरावतीतील समृद्धी महामार्गावर गावनेर-तळेगाव येथे घडली. खिजर खान सलीम खान (वय २०, पठानवाडी, ब्राह्मणपूर, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ट्रक (क्रं. एमपी ६८/झेडडी ३६२३) या ट्रकचा चालक फरदीन खान फजल खान (वय २४) हा नागपूरहून जालनाकडे जात होता. यादरम्यान ट्रक चालवत असताना गाडीचा टायर पंक्चर झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने क्लिनर खिजर खान याला खाली उतरून टायर तपासण्यास सांगितले. खिजर खान खाली उतरून टायर तपासत असताना पाठिमागून आलेल्या १२ चाकी भरधाव ट्रकने त्याला उडविले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह धामगाव रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत.