

अमरावती : शहराच्या मध्यवर्ती आणि दाट लोकवस्तीच्या रामपुरी कॅम्प परिसरात मंगळवारी (दि.२६) अचानक बिबट्या अवतरल्याने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. अंदाजे सात ते आठ महिन्याचा बिबट थेट एका गोदामात शिरल्याची घटना समोर आली. दरम्यान परिसरात भीती, गोंधळ आणि प्रचंड कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले.
तब्बल सहा तास सुरू असलेल्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर वन विभाग, पोलीस प्रशासन आणि बचाव पथकाने अखेर सायंकाळी बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद केले. अमरावतीत रामपुरी कॅम्प परिसरातील रहिवासी राजेंद्र तेजवानी हे दुपारी आपल्या फर्निचर गोदामात गेले असता आतमध्ये बिबट्या दबा धरून बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गोदामाचे शटर बाहेरून बंद केले आणि तात्काळ वन विभागाला माहिती दिली. त्यांच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, वन विभागाचे बचाव पथक, महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने परिसर पूर्णतः बंदिस्त करण्यात आला. मात्र बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हलक्या पावसातही शेकडो नागरिक घटनास्थळी ठाण मांडून होते. पोलिसांना गर्दी नियंत्रणासाठी मोठी कसरत करावी लागली. रेस्क्यूदरम्यान बिबट्याची हालचाल टिपण्यासाठी गोदामाभोवती जाळे, लोखंडी पिंजरा आणि विशेष उपकरणांचा वापर करण्यात आला. काही वेळ बिबट्या अत्यंत आक्रमक अवस्थेत असल्याने पथकाला संयमाने काम करावे लागले.
अखेर संध्याकाळच्या सुमारास बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यात यश आले आणि उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वन अधिकार्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, वाढत्या उष्णतेमुळे आणि पाण्याच्या शोधात हा बिबट्या शहराच्या दिशेने आला असावा. यापूर्वीही अमरावतीतील काही भागांत बिबट्यांच्या हालचाली दिसून आल्या आहेत. या संपूर्ण मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भाड यांच्या नेतृत्वाखाली वनपाल शाम देशमुख, फिरोज खान, अमोल गावणेर, बाबुराव खेरकर, गजानन लांदे, अतुल धसकट, संदीप ठाकरे, कैलास इंगळे, धारपवार, आकाश सारडा, गायकवाड, थोटे तसेच वनमजूर मनोज ठाकूर, ओंकार भुरे, वाहनचालक संदीप चौधरी, अक्षय चांबतकर, सुशील तायडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
याशिवाय गाडगे नगर पोलिसांचे पीआय गोरखनाथ जाधव, पीएसआय रोकडे, आरसीपी पथक, महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे, तसेच स्वयंसेवी संस्थांचे शंतनू पाटील व सुमित गवई हेही मोहिमेत सहभागी होते. पकडलेल्या बिबट्याला प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर वडाळी वनक्षेत्रात हलविण्यात आले असून, तो पूर्णतः निरोगी असल्याची माहिती वन विभागाने दिली. बुधवारी त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात येणार आहे.