

सरूड : सरूड (ता. शाहूवाडी) येथे महादेव टेकडीवरील गवताच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला चकवा देत पलायन केले. या धरपकडीत बिथरलेल्या बिबट्याने झडप घालून रेस्क्यू पथकातील वनरक्षक आशिष पाटील या कर्मचाऱ्याला जखमी केले.
मंगळवारी सकाळी 11 वाजता तासभर हे थरारनाट्य सुरू होते. बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आलेल्या विशेष रेस्क्यू पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. दरम्यान, पुरेशी तयारी तसेच सुनियोजनाच्या आभावामुळे बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन फसल्याचा आरोप करीत उपस्थित स्थानिक शेतकरी, नागरिकांनी वन विभागाच्या कामगिरीवर नाराजी बरोबर संतापही व्यक्त केला.
मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास स्वप्निल पाटील, चेतन पाटील हे दोघे शेतकरी तरुण जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले असताना त्यांच्या संकरीत गवताच्या प्लॉटमध्ये बिबट्या दिसला. याआधीही काही महिन्यांपूर्वी येथे पाटील यांनी जनावरांच्या संरक्षणासाठी बांधलेल्या जातिवंत कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला होता. यामुळे क्षणात सावध होत पाटील बंधूंनी गावातील मित्रांसह सरपंचांना याची माहिती दिली. प्रसंगावधानाने मित्रमंडळी घटनास्थळी दाखल झाली. त्याचवेळी सरपंच भगवान नांगरे यांनी वन विभागाला कळवून घटनास्थळी पाचरण केले.
बांबवडेचे वनपाल नाथा पाटील यांच्यासह सहकारी वन कर्मचारी तसेच मलकापूरचे ‘आरआरटी’ पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक तरुण, नागरिकांची गर्दीही झाली. बिबट्याने नागरी वस्तीत शिरण्याचा धोका होता. हा धोका टाळण्यासाठी पूर्व दिशेला वाघरी लावून बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न होता. मात्र, नेमका विरुद्ध बाजूने बिबट्या शेताबाहेर पडला. यावेळी वनरक्षक आशिष पाटील हे समोर पुढ्यात उभे ठाकल्याने बिबट्याने थेट त्यांच्या अंगावर झडप घातली. यामध्ये पोट आणि पाठीवर नख्या ओरखडून पाटील जखमी झाले.
परिमंडळ वन अधिकारी नाथा पाटील, वनरक्षक अक्षय चौगुले, आशिष पाटील, गुरुबचन हिप्परकर, दत्ता मुकाडे, वनसेवक जयसिंग पाटील, अमर कुडित्रेकर, अनिल पाटील (ड्रॉवर) व जलद कृती दलाचे कर्मचारी बिबट्याच्या रेस्क्यूसाठी प्रयत्नरत होते. तसेच, शेतकरी भगवान पाटील, महादेव कर्नाळे, जयदीप पाटील, रणजित पाटील यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांनी बिबट्याच्या रेस्क्यूसाठी पथकाला सहकार्य लाभले.
पथकाने सोडला सुटकेचा निःश्वास
निसटलेला बिबट्या टेकडीवरून जंगलाकडे पळून गेला. जीवावर बेतलेला मोठा बाका प्रसंग टळल्यामुळे पथकाने सुटकेचा निःश्वास सोडला. जखमी वनरक्षक पाटील यांच्यावर शासकीय आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले, अशी माहिती बांबवडे परिमंडळचे वनपाल नाथा पाटील यांनी दिली.