

Farmers Maha Elgar Rally Nagpur
अमरावती : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, मच्छीमार, शेतमजूर, दिव्यांग आणि मेंढपाळ बांधवांच्या मागण्यांसाठी सुरू झालेल्या महाएल्गार आंदोलनाला सोमवारी (दि.२७) निर्णायक वळण मिळाले. बेलोर्यातून शेकडो ट्रॅक्टरसह बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील ताफा नागपूरकडे रवाना झाला आहे.
आंदोलनाच्या सुरुवातीला बच्चू कडू यांनी बेलोर्यात आपल्या आई-वडिलांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि गावातील मंदिरात पूजन केले. त्यानंतर ट्रॅक्टर ताफ्याचा प्रारंभ झाला. प्रत्येक ट्रॅक्टरवर “जय जवान जय किसान” असे लिहिलेले ध्वज होते.
शेतकऱ्यांनी सरकारकडून दिलेल्या कर्जमुक्तीच्या आणि हमीभावाच्या आश्वासनांवर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली “सातबारा कोरा करू” ही घोषणा अद्याप पूर्ण झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अतिवृष्टी, ढगफुटी, बाजारभावातील घसरण आणि वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसल्याचे आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी सांगितले. कापसावरील आयातशुल्क माफ केल्याने परदेशी कापूस बाजारात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळत नाही. सोयाबीनचा शासकीय दर ५३३० प्रति क्विंटल असूनही शेतकऱ्यांना बाजारात फक्त ५०० ते ३००० दरम्यान दर मिळत आहेत.
या आंदोलनात मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांचाही सहभाग आहे. त्यांनी आपल्या जनावरांसह नागपूरकडे कूच केली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित या घटकांनाही शासनाच्या धोरणांचा परिणाम जाणवत असल्याचे ते म्हणाले.
बच्चू कडू यांनी सांगितले की, “शासनाच्या घोषणांवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील.” त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली.
या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अधिकृत पत्रक काढून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला समर्थन दर्शवले. त्याबद्दल बच्चू कडू यांनी त्यांचे आभार मानले.
बेलोर्यातून निघालेला ट्रॅक्टर ताफा सोमवारी वर्ध्यात पोहोचला असून, तेथे मुक्काम करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. २८) ताफा नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. नागपूरमध्ये आंदोलनाचा मुख्य टप्पा पार पडणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.