

अमरावती : जिल्ह्यातील मोर्शी ते चांदूरबाजार रोडवर असलेल्या येरला फळरोप वाटिकेमध्ये कृषी कार्यालयातील लिपिकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (दि.२३) सायंकाळी त्याचा मृतदेह आढळून आला होता. मोर्शी पोलिसांनी २४ तासात हत्या प्रकरणाचा तपास करत एकाला ताब्यात घेतले.
विनोद भास्करराव राऊत (वय ५२, समर्थ कॉलनी मोर्शी) असे या हत्या झालेल्या लिपीकाचे नाव असून याप्रकरणी कृषी कार्यालयातील गार्ड धनराज सुखदेव वानखडे (वय ५२, घाटलाडकी ,ह.मु श्रीकृष्ण पेठ मोर्शी ) याला अटक करण्यात आली. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे.
माहितीनुसार, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामध्ये लिपिक पदावर विनोद भास्करराव राऊत हे काम करत होते. गुरूवारी सायकांळी सातच्या सुमारास त्यांचा मृतदेह येरला येथील फळरोप वाटिकेमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
विनोद राऊत यांचे कृषी कार्यालयातील गार्डच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. याप्रकरणाची माहिती पती धनराज वानखडे याला मिळाल्याने त्याच्या मनात राऊत यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला होता. या द्वेष भावनेतून धनराज वानखडे याने विनोद राऊत यांची हत्या केली असावी, या संशय पोलिसांना आला. हा धागा पकडत पोलिसांनी आरोपी धनराज सुखदेव वानखडे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान आपणच राऊत यांची हत्या केल्याची कबुली वानखडे यांनी दिली. विनोद राऊत यांचा मुलगा तेजस राऊत याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात मोर्शी येथील उपनिरीक्षक शिवराज पवार, आकाश शिवणकर, अमंलदार छत्रपती करपते, स्वप्निल बायस्कर, अथर्व कोहळे यांनी केली.