

Mumbai Ex boyfriend stabbed girl
मुंबई : मुंबईच्या चिंचपोकळी काळाचौकी परिसरात एका तरुणाने तरुणीवर जीवघेणा हल्ला करून स्वत:चा गळा चिरून आपले जीवन संपविले. ही धक्कादायक घटना आज (दि.२४) सकाळी ११ च्या सुमारास दत्ताराम लाड मार्गावर घडली.
या हल्यात जखमी झालेल्या तरुणीला तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्ला केल्यानंतर आरोपीने स्वत:चा गळा चिरून घेतला. त्यालाही गंभीर जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्यामागील नेमकं कारण स्पष्ट झालेले नाही.
काळाचौकी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणाचे नाव सोनू बरई आहे. तर जखमी तरुणीचे नाव मनिषा यादव आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, मृत तरुण वारंवार मुलीवर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये ८ दिवसांपूर्वी वाद झाला होता. यातून दोघांचे ब्रेकअप झाले होते. मृत तरुणाने शेवटचे भेटण्यासाठी मुलीला नर्सिंग होममध्ये बोलावले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. यावेळी राग अनावर झालेल्या तरुणाने मुलीवर धारदार शस्त्राने वार केले. मुलीवर हल्ला केल्यानंतर त्याच शस्त्राने तरुणाने स्वत:ला मारून घेत आयुष्य संपवले.