

डोंबिवली : दिवाळीसाठी ५० रूपये देण्यास नकार दिल्याने सतापलेल्या घनचक्कर गर्दुल्ल्याने धारदार चाकूने दुकानदाराला भोसकले. यात दुकानदार गंभीर जखमी झाला असून या गर्दुल्ल्याच्या इतर पाच साथीदारांनी देखील दुकानदारावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार गुरूवारी (दि.२३) सकाळच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडला असलेल्या एका दुकानात घडला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी एका गर्दुल्ल्याला ताब्यात घेतले आहे.
यातील हल्लेखोर गर्दुल्ला हा सराईत गुंड असून यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये त्याला अटक करण्यात आली होती. अलीकडेच हा गर्दुल्ला तुरूंगातून सुटून बाहेर आला आहे. बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा दुकानदार, घाऊक व्यापारी, स्थानिक, खासगी आस्थापना चालकांना पैशांसाठी त्रास देण्यास सुरूवात केली.
दिवाळीचा सण असल्याने एका व्यापाऱ्याने कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडला असलेले दुकान सकाळी उघडले होते. दुकान उघडल्यानंतर ग्राहकांची वर्दळ सुरू झाली होती. इतक्यात समोरच्या रस्त्याने चाललेल्या सहा जणांपैकी एकाने दुकानात दुकानदाराकडे दिवाळी म्हणून ५० रुपयांची मागणी केली. अजून बोनी झाली नाही, तर तुला पैसे कुठून देऊ? असा सवाल करत दुकानदाराने त्या गर्दुल्ल्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून गर्दुल्ल्याचे टोळके संतापले. जवळपास अर्धा तास दुकानासमोर तमाशा सुरू केला. यादरम्यान एका गर्दुल्ल्याने दुकानदाराच्या अंगावर धाव घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हा हल्ला सुरू असताना इतर गर्दुल्ल्यांनी दुकानात घुसून दुकानदाराला बेदम मारहाण केली.
हा सारा प्रकार या भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद सुरू झाला आहे. दुकानदारावर हल्ला होताच इतर दुकानदार धाऊन आले. त्यांनी दुकानदाराला गर्दुल्ल्यांच्या तावडीतून सोडविले. काहींनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत इतर पाच गर्दुल्ले पसार झाले होते. एकाला पकडून ठेवण्यात दुकानदाराच्या सहकाऱ्यांना यश आले होते. पकडलेल्या गर्दुल्ल्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात सहा गर्दुल्ल्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस फरार गर्दुल्ल्यांचा शोध घेत आहेत.