अमरावती : मध्य प्रदेशातील इंदौर येथून अमरावतीत गुटख्याची तस्करी करणारा ट्रक आडवून धारणी पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई कळमखारजवळ गुरूवारी (दि.१२) दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली. यावेळी गुटख्यांची सहा पोती व ट्रक असा ३५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
हा गुटखा अमरावतीत कोणाकडे येत होता, ही बाब अद्याप स्पष्ट झाली नाही. धारणी पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. जयेश मिश्रा (वय ३०, रा. इंदौर,म.प्र.) आणि क्लिनर रामलाल मेहरा (वय २६, रा. इंदौर म.प्र.) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्करांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या हद्दीतून इंदौरहून अमरावतीला गुटख्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती धारणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी त्यांच्या पथकासह कळमखार गावाजवळ नाकाबंदी केली. दरम्यान पोलिसांना एमपी ०९ जीएस ९४८३ या क्रमांकाचा ट्रक दुपारी २ वाजता रस्त्याने येत असल्याचे दिसले. त्यावेळी पोलिसांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रक न थांबविता तो पळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून, त्याला काही अंतरावरच पकडले. पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये ६० पोती गुटखा आढळला.