

अमरावती : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. रविवारी (दि.२७) पावसाची झड कायम आहे. जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक धरणांमधून विसर्ग सुरू आहे. जलसाठ्यातही वाढ झाली आहे. पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली असून नदी नाले तुडुंब वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले असून पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पावसामुळे हाहाकार आहे.जनजीवन प्रभावित झाले आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी भरल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील धारणी तालुक्यात जोरदार पावसामुळे उतावली गावाजवळ चाकर्दा-पाटियाकडे जाणारा मार्ग दोन तास बंद होता. संततधार पावसामुळे शेतात पाणी साचायला सुरुवात झाली असून अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू असून दुपारी १ वाजेनंतर पावसाचा जोर वाढला. सतत बरसत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील धरण प्रकल्प भरायला लागले आहे.असाच काही दिवस पाऊस बरसला तर जिल्ह्यातील धरण प्रकल्प तुडुंब भरण्याची शक्यता आहे.
पावसामुळे धारणी,चिखलदरामध्ये हाहाकार आहे. गडगा, तापी, सिपनासह इतर नद्या ओसंडून वाहू लागल्या आहे. अनेक मार्गावर पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. नदीकाठी राहणार्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
अमरावती शहरात रिमझिम पावसासोबतच ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील मेघा नदी दुथडी भरून वाहत असून परिसरातील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.