

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही तासांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे विरूर–वरूण मार्गावरील चिचबोर्डी आणि सिर्शी गावाजवळील नाल्याला अचानक पूर आला. विरूर पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष पथकाने धाडसी आणि माणुसकीची बचावमोहीम राबवत पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन एस.टी. बसमधील शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना सुरक्षितरित्या त्यांच्या घरी पोहचवले.
काल बुधवारी (२३ जुलै २०२५) रोजी संध्याकाळी सुमारे ६:३० वाजता विरूर–वरूण मार्गावरील चिचबोर्डी आणि सिर्शी गावाजवळील नाल्याला अचानक आलेल्या पुरामुळे दोन महामंडळाच्या बस अडकून पडल्या. या बसमध्ये अंदाजे २५–३० शाळकरी विद्यार्थी आणि तितकेच गावकरी प्रवासी अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच विरूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि संतोष वाकडे यांनी तात्काळ शासकीय वाहनासह पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
पुराच्या पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांकडे पोलीसांनी धाव घेतली. दिवसभर उपाशी असलेल्या मुलांसाठी नाश्ता, बिस्किटे आणि पिण्याचे पाणी पुरवण्यात आले. पोलिसांनी सुमारे दोन तास त्यांच्या सोबत राहून त्यांना धीर दिला. पुराचे पाणी ओसरताच, पोलिसांनी शासकीय वाहन बससमोर उभे करून सर्व प्रवाशांना सुरक्षित रस्त्याने बाहेर काढले.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी लक्षात घेता पोलिसांनी स्वतः रात्री १२ पर्यंत डोंगरगाव, सुबई, कविडपेठ, चिंचोली आदी गावांमध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले. पोलिसांचे हे कार्य ही कौतुकास्पद आणि माणुसकीचा आदर्श घालणारी होती.
या धाडसी मोहिम पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ठाणेदार संतोष वाकडे यांच्या नेतृत्वात परि. पोउपनि दत्ताहरी जाधव, पोहवा विजय मुंडे, पोअं राहुल वैद्य, हर्षल लांडे, हर्षल चौधरी, बिभीषण खटके, सौरव पगडपेललीवार, चापोअं संजय कोडापे यांनी ही कामगिरी बजावली.
याबाबत पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पाणी साचलेल्या किंवा वाहत असलेल्या भागात जाणे टाळावे, विद्युत उपकरणांपासून दूर रहावे, आणि आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर संपर्क साधावानसे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना केले आहे.