Amravati : सराफ व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणाचे गूढ उकलले; मिस्त्रीच निघाला दगाबाज | पुढारी

Amravati : सराफ व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणाचे गूढ उकलले; मिस्त्रीच निघाला दगाबाज

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील तिवसा येथील त्रिमूर्ती नगरात सराफ व्यावसायिक संजय मांडळे यांच्या हत्या प्रकरणाचे गूढ ग्रामीण पोलिसांनी अखेर उकलले आहे. मिस्त्री कामासाठी आलेल्या एका २५ वर्षीय तरुणानेच भगवंत मांडळे याची हत्या करून नंतर त्याच्या घरातील रोख रकमेसह मौल्यवान ऐवज लुटला. नंतर आरोपी सायंकाळी घटनास्थळावरून निघून गेला. रात्री पुन्हा ८ वाजताच्या सुमारास तो घटनास्थळी नागरिकांच्या गर्दीतून सराफ व्यावसायिकाच्या घरी पोहोचला. विशेष म्हणजे तो दुसऱ्या दिवशी अंत्ययात्रेत देखील सहभागी झाला होता, असा खुलासा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तो तिवसा येथे वावरत होता. मात्र संशयित म्हणून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतल्यावर अखेर पोलिसांना खरा आरोपी सापडला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणासंदर्भात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी माहिती दिली. रोशन दिगंबर तांबटकर (२५, रा. देऊरवाडा, जि. वर्धा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तिवस्यातील त्रिमूर्तीनगर येथील रहिवासी सराफ व्यावसायिक संजय मांडळे याचा मृतदेह सोमवार, २७ नोव्हेंबर रोजी त्याच्याच घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. या प्रकरणी मृतक संजय याची मुलगी वैष्णवी हिने तिवसा ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अज्ञात आरोपीने वडिलांची हत्या करून ७४ लाख ६८ हजारांचा ऐवज लंपास केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

संजय मांडळे याच्या घरी गवंडी काम करणाऱ्या मिस्त्री रोशन तांबटकर याच्यावर पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्याची उलटतपासणी घेण्यात आली. रोशन हा तीन ते चार महिन्यांपासून संजय मांडळे याच्या घरी मिस्त्री म्हणून बांधकाम करीत होता. संजय मांडळे यांच्या मुलासोबत आरोपीची चांगलीच मैत्री झाली होती. त्यातूनच त्याला संजय मांडळे हे सोमवारी घरी एकटेच असतात. मुलगा आईला घेऊन रुग्णालयात जात असतो. मांडळे घरूनच व्यवसाय करतात, अशी माहिती गोळा केली होती.

सोमवारी घटनेच्या सायंकाळी संजय मांडळे हे एकटेच घरी होते. त्यावेळी रोशन हा दारू प्राशन करून त्याच्या घरी आला. त्याने मजुरीपेक्षा अधिक पैशांची मागणी मांडळे याच्याकडे केली. मात्र त्यांनी त्याला नकार दिल्यावर रोशन हा वरच्या मजल्यावरून खाली आला. तेथून कुदळीचा दांडा घेऊन तो पुन्हा वर गेला. त्याने संजय यांना सोपसुपारी मागितली. त्याला सोप सुपारी देऊन पानपुडा ठेवण्यासाठी संजय मागे वळताच त्याने लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यावर प्रहार करुन त्याची हत्या केली. त्यानंतर त्याने घरातील कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.

दरम्यान, तक्रारीत ७४ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे नमूद होते. मात्र, रोशनकडून केवळ १२ हजार रोख रकमेसह ७ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवजच जप्त करण्यात आला. त्यामुळे आरोपी रोशनने नेमका किती ऐवज लांबविला, याचा उलगडा पोलीस कोठडीदरम्यान होणार आहे. आरोपीला चार दिवसांचा पीसीआर देण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी गवसावा म्हणून पोलिसांनी तब्बल ६० संशयितांची तपासणी केली. आरोपी रोशनला २८ नोव्हेंबर रोजीच्या रात्रीच ताब्यात घेण्यात आले होते, अशी माहिती एसपी विशाल आनंद यांनी दिली.

हेही वाचा : 

Back to top button