

Pigeon Pea Pest Attack
अकोला : अकोट तालुक्यातील उमरा परिसरातील काही भागांत तूर पिकावर हुमणी अळीचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे तुरीचे झाडे जागेवर वाळत असल्याचे दिसते. यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. या वर्षी तूर पिकांची स्थिती चांगली दिसत असतांनाच शेतात तुरीच्या पिकावर हुमणीचा हल्ला होत आहे.
झाडांची पाने पिवळी पडतात आणि झाडे हळूहळू सुकतात किंवा कोलमडतात अळी जमिनीमध्ये राहून पिकांच्या मुळांना कुरतडते व खाऊन टाकते ज्यामुळे उभे पीक जागेवरच वाळते.
तुरीचे झाड उपटून पाहिल्यानंतर मातीत असलेली हुमणी अळी दिसून येते, असे शेतकरी सांगत आहेत. शेणखताचा वापर केलेल्या ठिकाणी हुमणी अळी चा प्रादुर्भाव इतर ठिकाणच्या तुलनेत अधिक आहे. मात्र, बहुतांश शेतात हुमणीच्या प्रादुर्भावाची तीव्रता अद्याप फारशी दिसत नसली तरी शेतकरी तूर पिकाच्या उत्पादना बाबत चिंतेत दिसत आहेत.
तुरीची सध्या वाढ होत असून फुले लागायला सुरुवात झाली आहे. मात्र हुमणी अळी बाबत वेळीच नियंत्रण केले नाही तर प्रादुर्भावात वाढ होऊन तुरीचे नुकसान वाढू शकते असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.