काझीखेड येथील घटनेतील दोषी शिक्षकांवर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना निलंबित करण्यात आले आहे. शाळांमध्ये सुरक्षितता उपाययोजनांसाठी सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश शासनाने बुधवारी (दि.21) निर्गमित केले आहेत. शिक्षकाने सहा अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याची बाब उघड झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडून संबंधित शिक्षक, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही बसविण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही तातडीने करावी, त्याचप्रमाणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसतील, त्यांनी ते प्राधान्याने बसवून घ्यावेत. आवश्यकतेनुसार निधीसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
शाळांमध्ये मुला-मुलींसाठी सुरक्षित व बालस्नेही वातावरण निर्माण होण्यासाठी ‘सखी सावित्री’ समितीच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात. समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा. लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या ‘ई बॉक्स’ या सुविधेची, तसेच ‘चिराग’ ॲपची आणि 1098 या हेल्पलाईन क्रमांकाबाबत जागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बालकल्याण समिती व अधिकारी यांच्या आजच्या बैठकीत दिले आहेत.