

चंद्रपुरामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. शाळकरी मुलीवर तिच्याच सहायक शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. वाढोणा येथील समाज सेवा विद्यालयात बुधवारी (दि.7) रोजी ही घटना घडली. दरम्यान विद्यार्थीनीने शुक्रवारी (दि.9) तक्रार दाखल केल्याने सहायक शिक्षकास पॉस्को अंतर्गत अटक करण्यात आली आहे. रुपेश गुलाबराब डोर्लीकर (वय.46) असे संशयित आरोपी शिक्षकाचे असून ते वाढोणा येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागभिड तालुक्यातील वाढोणा येथील समाज सेवा विद्यालयात सहायक शिक्षक म्हणून रूपेश डोर्लीकर कार्यरत आहेत. बुधवारी (दि.7) शाळा सुरु असताना वही तपासण्यासाठी एका विद्यार्थीनीला जवळ बोलविले. त्यानंतर सहायक शिक्षकाने तिचा विनयभंग केला. सदर प्रकार विद्यार्थीनीने मुख्याध्यापकांना सांगितला. दरम्यान पीडित मुलीने शुक्रवारी तळोधी (बा.) पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. पिडीत विद्यार्थीनीच्या तक्रारीवरून आरोपी सहायक शिक्षक डोर्लीवर याचेविरोधात बीएनएस धाराच्या पॉस्को गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अजितसिंग देवरे यांनी केली असून अधिक तपास सूरु आहे.