

अकोला-खंडवा ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या कामातील हलगर्जीपणाचा फटका आता शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. योग्य निचऱ्याची व्यवस्था न केल्यामुळे हिवरखेड परिसरातील अधिग्रहण न झालेल्या तब्बल ३०० हून अधिक एकर शेतीत पावसाचे पाणी साचले असल्याचा आरोप आहे. अनेक ठिकाणी ३ ते ४ फूट पाणी साचल्याने शेती पूर्णपणे जलमय झाली असून पिकांसह सुपीक जमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला.
अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा निचरा अडवला गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परिणामी, पावसाचे पाणी शेतांमध्ये साचून शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आजही ३ ते ४ फूट पाणी साचून असल्याने शेती करणे अशक्य झाले आहे. पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय जमिनीच्या सुपीकतेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासन आणि संबंधित विभागाकडे अनेकदा निवेदने देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी शेतात साचलेल्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनातून तातडीने पाण्याचा निचरा करावा, नुकसानीचे पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामुळे हिवरखेड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.