चंद्रपूर: अदानी समूहाच्या एसीसी सिमेंट कारखान्याच्या चौकशीचे आदेश

एसीसी सिमेंट कारखाना
एसीसी सिमेंट कारखाना

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर शहरापासून हाकेच्या अंतरावरील घुग्घूस येथील अदानी समूहाच्या एसीसी सिमेंट कारखान्याच्या चौकशीचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे.

अदानी समूहाच्या एसीसी सिमेंट कंपनीकडून होत असलेल्या पर्यावरण नियमाच्या उल्लंघनाबाबत तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीला घटनास्थळाची पाहणी, वस्तुस्थिती संकलित करणे आणि पर्यावरण नियम व कायद्याचे उल्लंघन झाल्यास दोन महिन्यांच्या आत समस्या सोडविण्यासाठी कायदेशीर कारवाई व उपाययोजना करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने दिले आहेत.

एसीसी सिमेंट कंपनीविरोधात सुरेश पाईकराव यांनी ७ जून २०२२ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांची तक्रार 'एनजीटी' कायदा २०१० च्या कलम १४ आणि १५ अंतर्गत याचिका म्हणून स्वीकारण्यात आली. सिमेंट कंपनीकडून नागपूर, मुंबई, पुणे, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि बंगळुरू येथून टाकाऊ कपडे, कालबाह्य औषधे आणत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जाळण्यात आलेले मृतदेह, प्लास्टिक, शेतीच्या कचऱ्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. कंपनीच्या या कृतीमुळे वर्धा नदीत जलप्रदूषण झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. रहिवासी भागात ट्रक उभे राहात असल्याने ध्वनी व वायू प्रदूषण होत असल्याची तक्रार होती. 'एनजीटी'ने या मुद्यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

यासाठी जिल्हा दंडाधिकारी, चंद्रपूर हे नोडल एजन्सी असतील. त्यांना समन्वय साधून या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. समितीने केलेल्या कारवाईचा अहवाल 'एनजीटी'कडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news