चंद्रपूर : चारित्र्यावर संशय घेत वृद्ध पत्नीला ७४ वर्षीय पतीने जिवंत जाळले | पुढारी

चंद्रपूर : चारित्र्यावर संशय घेत वृद्ध पत्नीला ७४ वर्षीय पतीने जिवंत जाळले

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वृद्ध ६५ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन 74 वर्षीय वृध्द पतीने घरीच आणलेल्या सरपणावर  पत्नीच्या अंगावर डिझेल टाकून जिंवत पेटवून दिले. ही खळबळजणक घटना मंगळवारी ( दि. 4 ) सुशी (जि. चंद्रपूर) या गावात घडली. उपचारासाठी नेत असताना वृद्ध पत्नीचा वाटेतच मृत्यू झाला. मुक्ताबाई गंगाराम शिंदे (वय 65) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पती गंगाराम सोमाजी शेंडे (वय 74) याला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम शेंडे (वय 75) हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. मंगळवारी त्याची पत्नी मुक्ताबाई आपल्या मुलीला घेऊन सकाळी सरपण आणण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास घरी परतल्यानंतर मुक्ताबाई आणि गंगाराम यांच्यामध्ये भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. तसेच गंगारामने पत्नीच्या डोक्यात काठीने मारल्याने ती बेशुद्ध पडली. संतापलेल्या पतीने अखेर तिनेच आणलेल्या सरपणाचे घरीच सरण रचले. त्यावर बेशुद्धावस्थेत असलेल्या मुक्ताबाईची चिता रचली. सरणावर डिझेल टाकून पत्नीला गंगारामने जिंवत जाळले.

सदर घटनेची चाहूल शेजा-यांना लागतात एकच खळबळ उडाली. प्रचंड आरडाओरड सुरु झाली आणि काही नागरिकांनी धाव घेत पेटलेल्या सरणावरील वृद्ध पत्नीला बाहेर काढले. मात्र यात वृद्ध महिला गंभीररीत्या भाजली गेल्याने तिची प्रकृती अस्वस्थ झाली होती. यावेळी घरी मुलगी ज्योती एकटीच होती. परंतु, ती मनोरूग्ण असल्याने ती आईची मदत करू शकली नाही. जखमी मुक्ताबाई यांना लगेच चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. प्रकृती अस्वस्थ असल्याने चंद्रपूर येथून नागपूरला हलविण्यात आले. दरम्यान उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्या वृद्ध मुक्ताबाईचा मृत्यू झाला. मूल पोलिसांनी आरोपी पती गंगाराम शेंडे याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

 

Back to top button