अकोला : ‘ऑपरेशन मुस्कान’ने आणले अनेकांच्या चेहऱ्यावर हसू; 85 व्यक्तींचा शोध घेण्यात यश | पुढारी

अकोला : 'ऑपरेशन मुस्कान'ने आणले अनेकांच्या चेहऱ्यावर हसू; 85 व्यक्तींचा शोध घेण्यात यश

अकोला, पुढारी वृत्तसेवा : ऑपरेशन मुस्कान या विशेष मोहिमेअंतर्गत 20 ते 31 डिसेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत 85 व्यक्तींचा शोध लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी दिली. या मोहिमेत जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचीही मोलाचे योगदान लाभले.

‘ऑपरेशन मुस्कान’ने खऱ्या अर्थाने अनेक दिवसापासून आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. अकोला शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बेपत्ता झालेली मुले, मुली, महिला, पुरुष यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ हे नाविण्यपूर्ण अभियान सुरु केले आहे. जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनअंतर्गत गेली अनेक वर्षे, महिन्यापासून बेपत्ता झालेल्या महिला, पुरुष व बालकांच्या मिसिंगच्या तक्रारी होत्या.

या तक्रारीचे निवारण ऑपरेशन मुस्कान अंतर्गत केल्या गेले. यासाठी एक स्वतंत्र ड्राईव्ह जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी आखला. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह अनैतिक मानवी वाहतूक नियंत्रण कक्ष, प्रत्येक पोलीस स्टेशनमधील दोन कर्मचारी यांची मदत घेण्यात आली. यासाठी 20 ते 31 डिसेंबर 2021 हा कालावधी निश्चित करण्यात आला.

पोलीस स्टेशनअंतर्गत प्राप्त झालेल्या मिसिंगच्या तक्रारीनुसार टिमने काम केले. त्याचे फलीत म्हणून 85 व्यक्तींचा शोध लावण्यात आला. यामध्ये 3 अपहत मुली, 58 महिला व 24 पुरुषांचा समावेश आहे. या मोहिमेचे यश पाहता पुढील कालावधीसाठी सुद्धा महिन्यातून एकदा ऑपरेशन मुस्कान ही नाविण्यपूर्ण मोहिम राबवली जाईल असेही जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.

Back to top button