चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा
गाईची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाला सर्वप्रथम गुराख्याने हुसकावून लावले. मात्र काहीच वेळात हाच वाघ शिकार केलेल्या गाईला खाण्यासाठी पुन्हा आला. त्यामुळे लोकांची चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी लोकांची पळापळ झाली. ही घटना चंद्रपूर जवळील भटाली गावाजवळ घडली.
भटाळी गावाजवळील इरई नदीलगत पट्टेदार वाघाने काल (बुधवार) एका गाईची शिकार केली. गुराख्याने आरडाओरड करून वाघाला कसेबसे पळवून लावले. लगेच गुराख्याने याबाबत गाईच्या मालकाला सांगितले. गावकऱ्यांसोबत गायमालक घटनास्थळी दाखल झाला. सदर घटनेची वार्ता सर्वत्र पसरल्याने त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली होती.
विशेष म्हणजे ज्या गाईंची शिकार पट्टेदार वाघाने केली, त्याच गाईला खाण्यासाठी परत पट्टेदार वाघ त्याच ठिकाणाकडे येऊ लागला होता. घटनास्थळावर जमलेले लोक असतानाही वाघ त्यांच्या दिशेने चाल करून आला. त्यामुळे लोकांची घाबरगुंडी उडाली. लोकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाघ दूर थांबून जागीच बसला.
वाघाने केलेल्या शिकारीवर ताव मारण्याच्या ठिकाणी लोकांची गर्दी बघून वाघ अधिकच खवळलेला होता. त्याची एकटक नजर लोकांकडे व शिकारीवर खिळली होती. लोकांची गर्दी व झालेल्या आरडाओरड्यानंतरही वाघ माघारी परतला नाही.
वाघाची आक्रमकता बघून नागरिकांनी वेळ वाया न दवडता अखेर घटनास्थळावरून पळ काढला. ही एक पट्टेदार वाघीण असून या परिसरात तिचा वावर आहे. या घटनेमुळे भटाळी गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात वाघांकडून हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.