चंद्रपूर : पट्टेदार वाघाने धडा वेगळे केले शेतकऱ्याचे अवयव 

चंद्रपूर : पट्टेदार वाघाने धडा वेगळे केले शेतकऱ्याचे अवयव 
Published on
Updated on

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : स्वत:च्या शेतातील पऱ्हाटीत असलेले गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने ठार केले. तो ऐवढ्यावरच थांबला नाही तर डोके, हात, पाय धडापासून वेगळे करीत शरीराच्या पोटाचा भाग खाऊन टाकला. देविदास महादेव गायकवाड (वय-४०) रा. सोनेगाव बेगडे (चिमूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या धडापासून वेगळे झालेले अवयव वनविभागाने वेगवेगळ्या शेतातून ताब्यात घेतले  आहे. घटनेची भीषणता लक्षात घेता चिमूर, सोनेगाव परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

चिमूर शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर सोनेगाव बेगडे हे छोटेसे गाव आहे. देविदास महादेव गायकवाड (वय-४०) हा शेतकरी तेथील रहिवासी होता. सदर शेतकऱ्याची शेती चिमूरला वरोरा मार्गावर पाॅवर प्लांटजवळ लागून आहे. त्याने शेतात यावर्षी पऱ्हाटीची लागवड केली आहे. सहा ते सात फूट उंच असलेल्या पिकाची देखरेख तो दररोज शेतात जावून करीत होता. शिवाय पऱ्हाडीत वाढलेले तन (गवत) काढत  होता. गुरूवारी (16 डिसेंबर) रोजी सकाळी दहाच्या सुमारास तो शेतात पथकातील गवत काढण्यासाठी गेला होता.

शेतातील पिक उंच असल्याने पिकात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाचा त्याला जराही मागोसा आला नाही.  त्यामुळे वाघाने त्याला पऱ्हाटीतच ठार केले. त्यामुळे सदर शेतकरी हा सायंकाळी घरी परत आला नाही. रात्र होवूनही घरी न परतल्याने म्हातारी आई आणि भाऊ यांनी, आपल्या काही नातेवाईकांसोबत शेतात जाऊन  शोधण्याचा प्रयत्न केला. पण, रात्रीची वेळ असल्याने त्याचा शोध लागला नाही.

दिवसाच शेतकऱ्याला वाघाने ठार केल्याने आणि शरीराचा बराचसा भाग खाऊन टाकला. डोके, हात, पाय धडापासून वेगळे करून घटनास्थळापासून अन्य दोन शेतकऱ्यांच्या शेतात नेऊन  टाकले. परत, आज शुक्रवारी 17 डिसेंबर) रोजी सर्व  प्रथम पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. तर नातेवाईकांनी पुन्हा सकाळपासून शेतकऱ्याची शोधमोहीम सुरू केली. शेतात माणूसभर उंच असलेल्या पऱ्हाटी पिकात घुसून पहाणी केली असता मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. त्याच्या शेतात शरीराचा काही भाग तर अन्य दोन  शेतकऱ्यांच्या शेतात धडापासून वेगळे केलेले शरीराचे अवयव आढळून आले.

या  घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असता वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी डोके, हात, पाय आणि धड वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात  घेतले. भितीमय वातावरणात मृतदेहाचे तुकडे तुकडे गोळा करून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले आहे. सदर  शेतकऱ्याच्या वाघाच्या ह्यातील ठार केल्याचे हे दृश्य बघून प्रचंड भितीमय वातावरण निर्माण झाले होते.  वनविभागाने सदर घटनास्थळ पहाणी केली असता वाघाच्या पायाचे पगमार्क आढळून आले आहे. विशेष म्हणजे  शेतकऱ्याला ठार केल्यापासून तर रात्रभर त्याच ठिकाणी वाघाने मुक्काम ठोकून शरीराला पूर्णत: खाऊन  टाकल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मृतक देविदास महादेव गायकवाड (वय-४०) याला  एक म्हातारी आई आणि एक भाऊ  आहे. सदर शेतकरी हाच म्हाताऱ्या आईचा कर्ता होता. परंतु त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिवार उघड्यावर पडला आहे. चिमूर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पऱ्हाटीचे उत्पादन घेतल्या जाते. सध्या पिक सहा ते सात फूट उंचीस आला आहे. त्यामुळे पिकांत  हिंस्र प्राणी जरी असले तरी ते दृष्टिपथास पडत  नाही. आणि अनेक शेतकऱ्यांचे पिक शेतात पडून आहेत. या घटनेमुळे शेतकरी आता  शेतात जाण्याला घाबरत  आहेत.

सोनेगाव  शेतशिवारात वाघाचे होते  वास्तव्य

चिमूरपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनेगाव बेगडे या परिसरातील शेतात पऱ्हाटीचे पिक उभे आहे. याच परिसरामध्ये काही दिवसांपासून एका भल्या मोठ्या पट्टेदार वाघांचे वास्तव्य आढळून आले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच काही नागरिकांना याच परिसरात वाघाचे दर्शन झाल्याने प्रत्यक्षदर्शी सांगतात. तसेच ताडोबा अभयारण्य काही किमीपासून लागून आहे. त्यामुळे ताडोबातीलच वाघ सिमालोघ्घंन करून शेतशिवारात  वास्तव्य करू लागले आहेत. वाघांचे नागरिकांना दर्शन होणे ही नित्याची बाब झाली आहे. मात्र वनविभाग वाघांच्या बंदोबस्तात कमी पडत असल्याच्या प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news