Tiger Hunting : विद्युत प्रवाह सक्रिय करून पट्टेदार वाघाची शिकार… | पुढारी

Tiger Hunting : विद्युत प्रवाह सक्रिय करून पट्टेदार वाघाची शिकार...

चंद्रपूर, पुढारी ऑनलाईन : शेतातील तारेच्या कुंपनाला वीज प्रवाहीत सक्रिय करून शाॅक लावून ठार झालेल्या पट्टेदार वाघाचा मृतदेह (Tiger Hunting) जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार आज गुरूवारी (16 डिसेंबर) सावली वनपरिक्षेत्रातील पेंढरी मक्ता उपवनक्षेत्रात येथे उघडकीस आला. या या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत चंद्रपूर लगतच्या मोरवा शेतशिवारात वाघाच्या झुंजीत सहा महिन्यांचा वाघाचा बछडा ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शेतीचा हंगाम सुरू असताना तीन-चार महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याने विद्युत प्रवाहीत कुंपण केले होते. दरम्यान त्या कुंपणाला सूरू असलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून पट्टेदार ठार झाला. मृतवाघाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह जमिनीत पुरला.

सावली वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या पेंढरी मक्ता येथे पट्टेदार वाघाची शिकार (Tiger Hunting) झाल्याची गुप्त माहिती  वनविभागाने मिळाल्यानंतर वनविभागाने एका घरी धाड टाकली असता वाघाच्या मिशा आढळून आल्या. त्यामुळे चार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये पांडुरंग मोनाजी गेडाम (वय-45), हिराचंद मुखरू भोयर (वय-35), रामदास बाजीराव शेरकी (वय-55), मारोती पोचु गेडाम (वय-36) सर्व रा. पेंढरी मक्ता यांचा समावेश आहे.

सदर चारही आरोपींना अटक केल्यानंतर वनकोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी व्ही. बी. कामडी यांचेसह पेंढरीचे क्षेत्रसहाय्यक भोयर सावलीचे राजू कोडापे, पाथरीचे वासुदेव कोडापे, व्याहाड खुर्दचे सुर्यवंशी आणि वनरक्षक एस डब्ल्यू शेंडे, व्ही. जी. चौधरी, एस. चुधरी, सी.एम. गायकवाड, नागोसे, अहिरकर, आखाडे ,आदे,आदी करीत आहेत.

वाघांच्या झुंजीत बछड्याचा मृतदेह आढळला

सावली तालुक्यात शिकारीच्या उद्देशाने वाघाला ठार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आजच गुरूवारी (16 डिसेंबर) चंद्रपूर लगतच्या मोरवा शेतशिवारात वाघाच्या झुंजीत सहा महिन्याचा वाघाचा बछडा ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मोरवा विमानतळ परिसरातील शेतशिवारात चार ते सहा महिन्याच्या वाघाचा बछड्याचा मृतदेह आढळला आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर वनविभागाच्या अखत्यारीत ही घटना घडली आहे. दुसऱ्या मोठ्या वाघाच्या झुंजीत बछड्याला मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. बछड्याचा डोक्यावर मोठ्या जखमा आढळून आल्यात. NTCA आणि वनविभाग अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बछड्याचे शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार करण्यात आले.

Back to top button