फोडाफोडीच्या राजकारणाचा लोकसभेत महायुतीला फटका: बच्चू कडू यांचा फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा

 लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला.
अमरावती, पुढारी वृत्तसेवा:  फोडाफोडीच्या राजकारणाचा महायुतीला लोकसभा निवडणुकीत फटका बसला आहे, अशा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.  मंत्रिमंडळ विस्तार नाही, एकाच मंत्राकडे दोन-दोन खाती आहेत. खाली राज्यमंत्री, पालकमंत्री नाही. त्यामुळे जनसंपर्क आपोआपच कमी झाला. महायुतीचा सगळा वेळ फोडाफोडीच्या राजकारणात गेला आणि याचाच फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका का बसला?

  • फोडाफोडीच्या राजकारणाचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका
  • मंत्रिमंडळ विस्तार नाही, एकाच मंत्राकडे दोन-दोन खाती आहेत.
  • राज्यमंत्री, पालकमंत्री नसल्याने जनसंपर्क कमी झाला.
  • महायुतीचा सगळा वेळ फोडाफोडीच्या राजकारणात
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू अमरावतीत माध्यमांशी आज  (दि.८) बोलत होते.
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बोलताना आमदार कडू म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि आमचा दूर-दूर पर्यंत संबंध नाही. आम्ही मंत्रिमंडळात स्थान मागणार नाही आणि दिले तरी ते घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.

 मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा कशाला?

दरम्यान,  अमरावती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला. या पराभवावरही त्यांनी भाष्य केले. नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांसारखे वागत होते. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. लोकांना त्यांचे वर्तन पटलेले नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणे लोकांना आवडलेले नाही. कोरोना काळातील वक्तव्य, झालेला  अतिरेक लोकांना पटला नाही. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले.

नवनीत राणा यांचा पराभव जनतेने केला

दरम्यान,  महायुतीचे घटक असताना देखील आमदार बच्चू कडू यांनी प्रहार पक्षातर्फे अमरावती लोकसभेत दिनेश बुब यांना उमेदवारी दिली. त्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. यावर देखील आमदार कडू यांनी स्पष्टीकरण दिले.

त्यांचा पराभव आमच्या उमेदवारामुळेच झालेला नाही. त्याला अनेक कारणे आहेत. जनतेने त्यांचा पराभव केला आहे. त्या पराभवाला स्वतः सुद्धा जबाबदार आहेत. त्यांनी स्वतःच्या वर्तनात बदल करावा. भाजपच्या मंडळींनी देखील त्यांना स्वीकारलेले नव्हते, असे देखील  कडू म्हणाले.

दरम्यान, आगामी विधानसभेच्या निवडणुकीत प्रहार पक्ष बडनेराच नव्हे, तर यावेळेस तिवसा विधानसभा सुद्धा लढणार आहे. संपूर्ण राज्यात आम्ही उमेदवार देणार आहोत, असे देखील त्यांनी सांगितले.
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news