सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्णपणे फेल : आमदार बच्चू कडू यांची केंद्र व राज्य सरकारवर टीका

सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्णपणे फेल : आमदार बच्चू कडू यांची केंद्र व राज्य सरकारवर टीका

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : मी सरकारमध्ये असलो तरी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलीही चांगली योजना दिली नाही. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्णपणे फेल झाले आहे,अशी टीका बुधवारी (दि. १४) आमदार बच्चू कडू यांनी केंद्र व राज्य सरकारवर केली.

हरियाणा आणि पंजाब बॉर्डरवर शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू माध्यमांशी बोलत होते. केंद्र सरकारचा निषेध करून त्यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन चिघडू नये यासाठी सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही आंदोलनात सहभागी होऊ असा इशारा दिला आहे.
अनेक गोष्टींची गॅरंटी मोदीजी देतात मग हमी भावाची गॅरंटी का देत नाही, असा सवालही त्यांनी केंद्र सरकारला विचारला. शेतकऱ्यांच्या सध्याच्या ज्या योजना आहेत,त्या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसे येत नाही उलट त्यांचा जेबकट होतो. त्यामुळे सरकारने ही डाकेखोरी बंद केली पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा असे ते म्हणाले.
दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. विकासाच्या जाळ्यात अनेक जण आहेत. विकासाच्या जाळ्यात अडकल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. अशोक चव्हाण दोन वेळा मुख्यमंत्री होते. पंधरा वर्षे कॅबिनेट मंत्री राहिले. ते भाजपमध्ये का गेले हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र लोकांच्या मनामध्ये संभ्रम असून ते भाजपमध्ये का गेले हे स्पष्ट झालं पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना, बच्चू कडू यांनी कोण कोणत्या पक्षात विलीन होईल, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे सांगत हीच स्थिती राहिली तर विरोधकांची भूमिका प्रहारला पार पाडावी लागेल असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news