गोंदियात मित्रानेच केला मित्राचा खून | पुढारी

गोंदियात मित्रानेच केला मित्राचा खून

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच आपल्या मित्राचा धारदार शस्त्राने खून केला. ही घटना गुरूवारी (दि. २३) रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास शहरातील छोटा गोंदिया/ गोविंदपूर परिसरातील जितेश चौकात घडली. राहुल दिलीप बिसेन (वय २२, रा. शास्त्री वार्ड, गोंदिया) असे मृत युवकाचे तर प्रतीक उर्फ सोनू सुनील भोयर (वय २३, रा. जितेश चौक, गोंदिया) असे आरोपी मित्राचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा नोंद करून काही तासातच आरोपीला अटक केली आहे.

मृत राहुल व सोनू हे दोघेही मित्र होते. दरम्यान, घटनेच्यावेळी जितेश चौक परिसरात दोघांमध्ये काही क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. यात सोनूचा राग अनावर झाल्याने त्याने धारदार चाकूने राहुलच्या पोटावर व  छातीवर वार करुन त्याचा खून केला व घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर, शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी फिर्यादी दिलीप जीवनलाल बिसेन (वय ४५ रा. शास्त्री वार्ड) यांनी तक्रार दिली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी आरोपीला तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांच्या नेतृत्वात  आरोपीच्या शोधाकरीता विविध पथके नेमण्यात आली होती.  दरम्यान, गोंदिया शहर पोलीस पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत संशयित आरोपी प्रतीक ऊर्फ सोनु राजेंद्र भोयर याला अटक केली. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखडे यांनी केला असून गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिनी बानकर करीत आहेत..

हेही वाचा

Back to top button