Shahrukh Khan : शाहरुख खानची प्रकृती बिघडली, अहमदाबादच्या रुग्णालयात ॲडमिट | पुढारी

Shahrukh Khan : शाहरुख खानची प्रकृती बिघडली, अहमदाबादच्या रुग्णालयात ॲडमिट

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shahrukh Khan : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किंग खानला उष्माघाताचा त्रास झाल्याने त्याला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहेत. शाहरुख हा मंगळवारी (दि. 21) आयपीएल क्वालिफायर 1 साठी त्याचा संघ केकेआरला सपोर्ट करण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हजर होता.

उष्माघातामुळे तब्येत ढासळली

मंगळवारी अहमदाबादमधील तापमान 40 अंशांच्या पुढे होते. अशा परिस्थितीत शाहरुख खानची प्रकृती उष्माघातामुळे बिघडल्याचे समोर आले असून त्रास जाणवताच त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.

मुलगा अबरामसोबतचा व्हिडिओ व्हायरल

शाहरुख खान IPL 2024 क्वालिफायर 1 च्या सामन्यात मुलगा अबराम आणि मुलगी सुहाना खानसोबत त्याचा मालकीचा संघ केकेआरला सपोर्ट करताना दिसला होता. सुपरस्टारचा मैदानावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो अबरामसोबत केकेआरच्या विजयानंतर डान्स करताना दिसला. या सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली.

गेल्या वर्षी नाकावर शस्त्रक्रिया

याआधी शाहरुख खानला जुलै 2023 मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, त्याचा अमेरिकेत अपघात झाला होता आणि त्याच्या नाकाला दुखापत झाल्यामुळे त्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागली होती.

शाहरुख खानने गेल्या वर्षी ‘पठाण’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर जोरदार पुनरागमन केले. गेल्या वर्षी त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आणि तिन्ही हिट ठरले. ‘पठाण’ व्यतिरिक्त किंग खान ‘जवान’ आणि ‘डंकी’मध्ये दिसला होता. आता तो ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत त्याची मुलगी सुहाना खान देखील असेल. सुहानाने गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या द आर्चीज चित्रपटाद्वारे पदार्पण केले आहे.

 

Back to top button