अवकाळीने हरितगृहचालकांचे नुकसान | पुढारी

अवकाळीने हरितगृहचालकांचे नुकसान

दिवे : पुढारी वृत्तसेवा : मागील आठवडाभर अवकाळी पावसाने विविध भागांत जोरदार हजेरी लावल्याने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. दिवे परिसरातदेखील मागच्या दोन ते तीन दिवसांत वळवाने हजेरी लावली. या पावसाने हरितगृह चालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सध्या दिवे परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वजणच वळवाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, पाऊस कमी, वार्‍याचा वेग आणि विजांचा गडगडाट जास्त अशी स्थिती आहे. या पावसामुळे जमिनीच्या मशागतीच्या कामाला वेग येणार आहे. शिवाय मेढपाळांनादेखील दिलासा मिळाला आहे. मात्र, विहिरींच्या पाणी पातळीत किंचितदेखील वाढ झाली नाही. त्यामुळे अजून दमदार पावसाची गरज दिवे परिसराला आहे.

दुसरीकडे मात्र या पावसामुळे हरितगृह चालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सचिन झेंडे, राहुल झेंडे, प्रमोद टिळेकर, विनोद टिळेकर या शेतकर्‍यांनी दुष्काळी परिस्थितीत अक्षरशः टँकरच्या पाण्यावर हरितगृहातील पिके जोपासली होती. परंतु वार्‍याच्या वेगाने हरितगृहावरील आच्छादन फाटल्याने या शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यावर्षी जेवढे उत्पादन मिळाले ते टँकरच्या पाण्यासाठी खर्च केले आणि आता अजून मोठा आर्थिक फटका बसल्याने या शेतकर्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

नुकसानीचे पंचनामे करा

अजूनही दोन-चार दिवस वळवाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याने हे शेतकरी भयभीत झाले आहेत. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. एकीकडे वळवाच्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे मात्र काही शेतकर्‍यांचे अक्षरशः होत्याचे नव्हते झाले आहे.

हेही वाचा 

Back to top button