पुणे-नागपूर विशेष रेल्वेला ‘लेट मार्क’; पुणे स्थानकावर प्रवासी ताटकळले | पुढारी

पुणे-नागपूर विशेष रेल्वेला ‘लेट मार्क’; पुणे स्थानकावर प्रवासी ताटकळले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून नागपूरसाठी सोडण्यात येणार्‍या विशेष रेल्वेला (ट्रेन क्र. 01166) शुक्रवारी तब्बल तीन तास उशीर झाला. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना पुणे स्थानकावरच ताटकळत बसावे लागले. गेल्या काही दिवसांत सातत्याने रेल्वेगाड्यांना होत असलेल्या ‘लेट मार्क’मुळे रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी पुणे-नागपूर विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला. ही गाडी शुक्रवारी (दि. 17) दुपारी 3.50 वाजता पुणे स्थानकावरून नागपूरसाठी सुटणार होती.

मात्र, ही गाडी सायंकाळचे 7 वाजले तरी पुणे रेल्वे स्थानकावर आली नाही. तब्बल तीन तास प्रवाशांना या गाडीची वाट पाहत पुणे स्थानकावरच थांबून राहावे लागले. यामुळे या गाडीच्या प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. प्रवासी भास्करराव पाठक म्हणाले, पुणे-नागपूर या विशेष गाडीला तीन तासांपेक्षा अधिक उशीर झाला. आम्हाला बसून बसून वैताग आला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या वेळेत चालवाव्यात.

नागपूर-पुणे विशेष गाडी शुक्रवारी नागपूरहून 3 तास 42 मिनिटे पुण्यात उशिरा आली. रॅक उपलब्ध नसल्याने पुण्यातून दुपारी जाणारी पुणे-नागपूर विशेष गाडीसुद्धा पुण्यातून उशिरा सुटली आहे. याबाबत संबंधित विभागाकडून अधिक माहिती घेतली जाईल.

– रामपाल बडपग्गा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे

विशेष गाड्यांची नेहमीच ‘ढकलगाडी’

विशेष गाड्यांकडे रेल्वे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पुणे रेल्वे स्थानकावर देखील असेच चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. पुणे-नागपूर (01166) दुपारी 3.50 वाजता सुटणार होती. ती सायंकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी नागपूरकडे रवाना झाली. पुणे-गोरखपूर स्पेशल गाडीला (01431) पूर्ण दिवस उशिरा सोडण्याचे नियोजन करण्यात आले. म्हणजेच, ही गाडी 17 तारखेऐवजी 18 तारखेला दुपारी सोडण्यात येणार आहे. तब्बल एक दिवस ही गाडी लेट सुटणार आहे, तर एलटीटी-भुवनेश्वर गाडीसुध्दा उशिरा धावली. त्यासोबतच 17 तारखेला सुटणारी आझाद हिंद एक्स्प्रेससुद्धा दुसर्‍या दिवशी म्हणजेच 18 तारखेला सोडण्याचे नियोजन केले आहे. ही गाडी 18 तारखेला सकाळी सुटणार आहे. म्हणजेच, ही विशेष गाडीसुद्धा एक दिवस उशिरा सुटणार आहे.

हेही वाचा

Back to top button