अमरावतीत ‘वंचित’ची बंडखोरी; पक्षादेश धुडकावत जिल्हाध्यक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा | पुढारी

अमरावतीत 'वंचित'ची बंडखोरी; पक्षादेश धुडकावत जिल्हाध्यक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: लोकसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर येऊन ठेपले असताना अमरावतीत वंचितमध्ये बंडखोरी झाली आहे. यामुळे वंचितला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश गवई यांनी पक्षादेश धुडकावत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडल्याचे चित्र आहे.
समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा वाढता दबाव असल्याने पक्षाविरोधात निर्णय घेतला असल्याची माहिती शैलेश गवई यांनी रविवारी (दि.२१) पत्र परिषदेत दिली. आता या बंडखोरीमुळे वंचित कडून जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांच्यावर कारवाई होणार का ?  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वंचितने अमरावती लोकसभेमध्ये आपला उमेदवार दिलेला नाही. मात्र, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच जिल्हाध्यक्ष गवई हे नाराज आहेत. रिपब्लिकन सेना वंचितच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देत नसल्याचा आरोपही गवई यांनी केला आहे. दरम्यान, आता वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई हे बळवंत वानखडे यांचा प्रचार करणार आहेत. गवई यांच्यासोबत अमरावती शहराध्यक्ष तसेच चांदूरबाजार, अचलपूरसह पाच तालुकाध्यक्ष देखील या बंडखोरीत सहभागी आहेत.
हेही वाचा 

Back to top button