चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या डिवाईडला जोराची धडक देऊन नाल्यात कोसळलेल्या एका कारने पेट घेतला. या अपघातात अज्ञात चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना आज शुक्रवारी (दि. ८) रोजी सकाळी नागपूर- चंद्रपूर मार्गावरील भद्रावतीपासून ५ किमी अंतरावरील कोंढा नाल्यात उघडकीस आली आहे. अज्ञात चालकाची अद्याप ओळख पटलेली नाही.
संबंधित बातम्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक कार (क्र. 23 बिएच 68550 ) चालक हा चंद्रपूर- नागपूर मार्गावरील भद्रावतीच्या दिशेने येत होता. भद्रावती पासून ५ किमी अंतरावरील कोंढ्यानाल्यावरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारची पुलाच्या डिवाईडला जोरदार धडकली. त्यानंतर ही कार नाल्यात कोसळली.
दरम्यान कारमधून चालकाने बाहेर पडल्याचा प्रयत्न केला परंतु, तो बाहेर निघून शकला नाही. यावेळी कारमध्ये फक्त चालकच होता. कारने काही वेळात पेट घेतला. त्यामुळे अज्ञात चालकाचा होरपळून मृत्यू झाला. सकाळी काही नागरिकांना नाल्यात कार पेटलेल्या अवस्थेत आढळून आली.
यानंतर भद्रावती पोलिसांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली असता, कारमध्ये अर्धवट होरपळलेल्या अवस्थेत चालक आढळून आला. सदर कार ही भद्रावती येथील असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, चालकाचे नाव अद्याप काळू शकले नाही. भद्रावती पोलिस त्याचा शोध घेत आहेत.