हवाला प्रकरणी नागपुरात ९ व्यावसायिकांवर पाेलिसांची धाड; ८४ लाखांची रोकड जप्त | पुढारी

हवाला प्रकरणी नागपुरात ९ व्यावसायिकांवर पाेलिसांची धाड; ८४ लाखांची रोकड जप्त

नागपुर; पुढारी वृत्तसेवा

नागपूरातील हवाला व्यापाऱ्यांवर पोलीसांनी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये लाखो रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. त्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. नागपुरात पोलिसांनी नऊ ठिकाणी झाडाझडती घेत, हवालाची ८४ लाख रुपयांची रोकड रात्री जप्त केली. यामुळं हवाला व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी ही धडक कारवाई केला. नागपुरात सुमारे दोनशे हवाला व्यावसायिक आहेत. हे व्यवसायिक कोट्यवधीच्या रक्कमेची हेराफेरी करतात. यापैकी नऊ ठिकाणी लकडगंज आणि इतवारीत पोलिसांनी धाडी टाकल्या.

मागील २४ तासांपासून नागपुरात हवाला व्यावसायिकांवर हे छापासत्र सुरू आहे. यात अमरदीप टॉकीजवळ असलेल्या एका बड्या व्यापार्‍याच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. जप्त करणऱ्यात आलेली रक्कम हवालाची असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर पोलिसांनी इतवारी आणि लकडगंजमधील अन्य ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडी किराणा व धान्य विक्रीशी संबंधित व्यापारी आहेत.

धान्य बाजार येथे दुमजली इमारत आहे. त्या इमारतीत २२ खोल्या आहेत. काही खोल्यांमध्ये एका खासगी कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात हवालाच्या पैशांचा व्यवहार होतो, अशी माहिती लकडगंज पोलिसांना मिळाली होती. येथील कारवाईदरम्यान पोलिसांनी सर्वप्रथम दोन लॉकरची तपासणी केली. त्यात ४४ लाख रुपये मिळून आले. त्यानंतर उर्वरित खोल्यांची तपासणी केली असता आणखी दोन लॉकर मिळून आले. या दोन्ही लॉकरमध्ये ४० लाख रुपये सापडले.

घटनास्थळी पोलिसांना दोनशेच्यावर लॉकर्स सापडली. हे लॉकर्स कुणाचे आहेत, हे पूर्णपणे समजू शकले नाही. बहुतांश लॉकर्समध्ये लाखोंची रोकड, नोटा मोजण्याचे साहित्य पोलिसांच्या हाती लागले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना याची माहिती देण्यात आली. प्राप्तीकर विभागाचे अधिकारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही स्वतंत्रपणे चौकशी करीत आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button