Vijay Vadettiwar : कंपन्यांना धमकावत भाजपने ९५ टक्के हेलिकॉप्टर केली बुक : विजय वडेट्टीवार | पुढारी

Vijay Vadettiwar : कंपन्यांना धमकावत भाजपने ९५ टक्के हेलिकॉप्टर केली बुक : विजय वडेट्टीवार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. सत्तेसाठी पैसा, पैशातून सत्ता हा खेळ सुरू असून निवडणुकीच्या तोंडावर पक्ष फोडले जात आहेत. माणसे फोडली जात आहेत. विरोधकांना नामोहरम करण्याचे काम सुरू आहे. भाजप जवळ पैशाचा पूर एवढा आहे की, त्यांनी प्रचारासाठी ९५ टक्के हेलिकॉप्टर आताच मार्च ते मे या काळात बुक केली आहेत. विरोधकांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर मिळू नये, अशी कंपन्यांना धमकी देत व्यवस्था भाजपने केली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज (दि.२३) पत्रकारांशी बोलत होते. Vijay Vadettiwar

वडेट्टीवार म्हणाले की, एकीकडे माणसे फोडून विरोधकांना हैराण करायचे, पक्षनिधी गोठवायचा आणि आता त्यांना प्रचाराला साधनेच मिळू नये, अशी व्यवस्था हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे लोकांच्या मनात जो राग आहे, तो राग तुम्ही हवाई यात्रा करून प्रचार केला. तरी थांबणार नाही. तो तुम्हाला भोगावाच लागेल. भ्रष्टाचारातून प्रचंड पैसा या सरकारने जमा केला आहे आणि त्यातून ही जी साधने वापरली जाणार आहेत. यांना विचारणार कोणी नाही, निवडणूक आयोग सुद्धा त्यांच्या मुठीत आहे, असेही ते म्हणाले. Vijay Vadettiwar

डॉक्टर संपा संदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, खूप दिवसांपासून मार्डच्या डॉक्टरांची मागणी आहे. मात्र, सरकार त्यावर लक्ष घालायला तयार नाही. हे आम्ही पण सरकारच्या लक्षात आणून दिले होते. आरोग्य यंत्रणेकडे टेंडर व्यतिरिक्त सरकार गांभीर्याने बघताना दिसतच नाही. यातून आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. सामान्य माणसाला जगणं कठीण होणार आहे. हा संप त्वरित मिटवला गेला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची 27 फेब्रुवारीला शेवटची बैठक आहे. सहा ते सात जागांचे प्रश्न आहेत. विदर्भातील दहा पैकी किमान सहा- सात जागा काँग्रेसला मिळतील, कमी-जास्त होऊ शकतात. मला विचारलं की, तुम्ही लोकसभेला लढणार का? तर मी म्हटले हो. पक्षश्रेष्ठी जे ठरवतील तेच मी करेल. पक्ष कोणालाही उगीच उमेदवारी देत नाही, जिंकण्याची शक्यता असेल, तरच उमेदवारी दिली जाते.

दुसरीकडे जरांगे यांनी दिलेल्या आंदोलन, रस्ता रोको संदर्भात छेडले असता जरांगेंच्या शब्दांत आता काही दम राहिलेला नाही. त्यांचा कधीकाळी लाखोंच्या सभा घेणारे नंतर भाजपमध्ये गेलेले हार्दिक पटेल झालेला दिसेल, असे टीकास्त्र सोडले. आता सरकारने जे दिले आहे, त्यात समाधान मानावे. ते कसे टिकेल याकडे लक्ष द्यावे, उगीच चॅलेंज करणारी भाषा वापरू नये. त्यांच्या भाषेत गर्व दिसतो, गुर्मी दिसते, ती दाखवण्याची गरज नाही. निवडणुकीच्या तोंडावर आता त्यांनी काहीही करू नये. सरकारने जे दिले, ते आता कोर्टात टिकविण्यासाठी जबाबदारी सरकारची आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button