मुंबई, पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने सुसंस्कृत, प्रगल्भ नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली असून त्यांची उणीव सदैव भासेल, अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, नगरसेवक, महापौर, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष अशी विविध महत्वाची पदे मनोहर जोशी यांनी भूषवली. त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांसाठी प्रेरणादायी होते. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहणारे आहे. व्यासंगी राजकारणी ही त्यांची ओळख सर्वश्रुत आहे. लोकशाहीचा पुरस्कार करणारे, विकासाचा ध्यास असणारे ते नेते होते. Vijay Wadettiwar
कोहिनूर सारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, सिंचनातील कृष्णा खोरे विकास महामंडळाची सुरुवात, टॅकरमुक्त महाराष्ट्र, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवातही त्यांच्या प्रयत्नाने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. जोशी कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जोशी कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना करतो. जोशी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहे.
हेही वाचा