छत्तीसगड : हिदूर जंगलात चकमक; नक्षल्यांची स्फोटके जप्त | पुढारी

छत्तीसगड : हिदूर जंगलात चकमक; नक्षल्यांची स्फोटके जप्त

गडचिरोली: पुढारी वृत्तसेवा : छत्तीसगड सीमावर्ती भागातील हिदूर गावानजीकच्या जंगलात काल बुधवारी (दि. ७) रोजी संध्याकाळी पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी नक्षल्यांना पिटाळून लावत त्यांच्याकडील स्फोटके आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या 

छत्तीसगड राज्यातील कांकेर आणि नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेलगत वांगेतुरी येथे गडचिरोली पोलिसांनी नव्यानेच पोलिस मदत केंद्र सुरु केले आहे. शेजारीच गर्देवाडा येथेही पोलिस मदत केंद्र आहे. या दोन्ही पोलिस मदत केंद्रांची रेकी करण्यासाठी हिदूर परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी आले होते. ही माहिती मिळताच अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाच्या दीडशेहून अधिक जवान त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविले.

दरम्यान बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षली पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाहून पिट्टू, स्फोटके, वायर, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माईन्सचे हूक, सोलर पॅनल तसेच अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे.

Back to top button