कुंभार तलाव कोरडाठाक; वाघोली परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर | पुढारी

कुंभार तलाव कोरडाठाक; वाघोली परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर

वाघोली : पुढारी वृत्तसेवा : वाघोली परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायत कालावधीत या भागासाठी कुंभार तलाव वरदान ठरत होता. परंतु, त्यामध्ये पाणी सोडण्यासही प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. यामुळे हा तलाव सध्या कोरडाठाक पडला असून, त्यात पाणी सोडण्याची मागणी होत आहे. वाघोली गावाचा समावेश महापालिकेत झाल्याने पाणी पुरवठा करण्याची जबाबदारीही महापालिकेची आहे. ही बाब लक्षात घेता कुंभार तलावात पाणी सोडण्याची सूचना संबंधित विभागास करण्यात यावी, अशी मागणी नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांच्याकडे ज्ञानेश्वर कटके व समीर भाडळे यांनी केली आहे.

वाघोली ग्रामपंचायत कालावधीत छत्रपती संभाजीनगर, बायफ रोड येथील कुंभार तलावात वढू येथील पाणी योजनेतील पंप हाऊस मधील ओव्हरफ्लोचे पाणी सोडले जात होते, त्यामुळे बायफ रोड, छत्रपती संभाजीनगर, आनंदनगर, नवनाथ नगर आदी परिसरातील कुपनलिकांना भरपूर पाणी उपलब्ध होत होते. परंतु यावर्षी पावसाळ्यात कुंभार तलावात पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे परिसरात पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. परिसरातील पुणे-नगर रोडवरील पंप हाऊसमधील ‘ओव्हरफ्लो’चे पाणी सध्या वाघेश्वर तलावात सोडले जाते. त्याच पार्श्वभूमीवर बायफरोड येथील कुंभार तलावात पाणी सोडले, तर परिसरातील सर्व कुपनलिकांना नवसंजीवनी मिळेल. तसेच बाईफरोड, आरएमसी गार्डन सोसायटीधाराकांसह परिसरातील जवळपास 10 ते 15 हजार नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असे या निवेदनात नमूद केले आहे.

Back to top button