Kunal Raut : पंतप्रधानांच्या फोटोला काळे फासल्याप्रकरणी कुणाल राऊत यांना अटक | पुढारी

Kunal Raut : पंतप्रधानांच्या फोटोला काळे फासल्याप्रकरणी कुणाल राऊत यांना अटक

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या परिसरात लावलेल्या सरकारी योजनेच्या पोस्टरवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला काळे फासल्याप्रकरणी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना आज (दि. ४) सायंकाळी अटक करण्यात आली. नागपूर ग्रामीण पोलिसांनी राऊत यांना कुही येथून ताब्यात घेतले. त्यानंतर नागपुरातील मेडिकल रुग्णालयात राऊत यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. Kunal Raut

शनिवारी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत काँग्रेसचे नेते, माजी मंत्री रोखे घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेले सुनील केदार यांच्या छायाचित्रावरून बजेटची होळी करणाऱ्या भाजप सदस्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव सत्तारूढ पक्षाने पारित केला. दुसऱ्या दिवशी कुणाल राऊत यांनी जिल्हा परिषद परिसरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासले. भारत सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले स्वतःचे नाव देत गवगवा करीत असल्याचा निषेध यावेळी काँग्रेसने केला. या विरोधात भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाने सोमवारी (दि.५) आंदोलनाचा इशारा दिला आहे. Kunal Raut

दरम्यान, काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अटकेची मागणी पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकरराव कोहळे, महानगर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी केली होती. पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणी सोमवारी (दि.५) दुपारी १२ वाजता हजर राहण्याची नोटीस दिली होती. त्यापूर्वीच राऊत यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला जाणीवपूर्वक काळे फासणाऱ्या काँग्रेसी कार्यकर्त्यांना अटक करा, कोर्टाने दोषी ठरवलेल्या माजी आमदार सुनील केदार यांचा फोटो जिल्हा परिषद कार्यालयातून हटवण्याची मागणी भाजपने केली आहे.

हेही वाचा 

Back to top button